महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा: अजीत पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या 50 बड्या नेत्यांवर गुन्हे दाखल
अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (Photo Credits- Facebook )

Maharashtra State Co-op. Bank Scam: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत तब्बल 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पाच दिवसात गुन्हे दाखल करा असे निर्देश उच्च न्यायालाने 22 ऑगस्ट रोजी दिले होते. त्यानुसार आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे सोबतच इतर तब्बल 50 अनेक नेत्यांवर आता गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. मुंबई मधील एमआरए पोलीस ठाण्यामध्ये हे गुन्हे दाखल केले आहेत.

एएनआय ट्विट : 

अजित पवार या बँकेच्या संचालक पदी होते. सन 1961 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, यामध्ये अनेक बड्या राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचा आरोप आहे. या बँकेमध्ये इतक्या मोठ्या रकमेची कर्जे सूट गिरणी आणि साखर कारखान्यांना नियमबाह्य पद्धतीने वितरीत केली असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

(हेही वाचा: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ: पाच दिवसात गुन्हे दाखल करा, उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे अजीत पवार, हसन मुश्रीफ, मधू चव्हाण अडचणीत)

हा घोटाळा उघडकीस आल्यावर मोठा गदारोळ मजला होता. रिझर्व्ह बँकेने ताबडतोब कारवाई करत या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते व या गोष्टीच्या चौकशीचे आदेश दिले होते. यामध्ये शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांचा समावेश होता. या घोटाळ्याबाबत आरोप करणारी याचिका 2015 साली सुरिंदर अरोरा यांनी दाखल केली होती. कोर्टाच्या आदेशानंतर अखेर आज या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.