औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी पुण्यातील औंध परिसरात एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात पुण्यातील चतुश्नूंगी पोलीस ठाण्यात (Chatushrungi Police Station) खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी दुचाकीवरून जात असताना जाधव यांनी रस्त्यातच अचानक त्यांच्या वाहनाचा दरवाजा उघडला. यामुळे फिर्यादीची दुचाकी थेट जाधव यांच्या कारवर धडकली. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला त्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे.
अमन अजय चड्डा असे तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अमन हे पुण्यातील बालेवाडी परिसरातील रहिवासी आहेत. अमन चड्डा हे त्यांचे आई-वडील सोमवारी सकाळी 8 वाजता दुचाकीने औंध येथील ब्रेमन चौकाकडे जात होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी अचानक आपल्या कारचा दरवाजा उघडला. त्यावेळी हर्षवर्धन यांच्यासोबत इषा बालाकांत झा देखील होत्या. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या अमन यांना हर्षवर्धन यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची माहिती न्युज 18 लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Hinganghat Burning Case: हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाची प्रत्यक्ष सुनावणी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात सुरु होईल- उज्ज्वल निकम
या प्रकरणी पुण्यातील चतुश्नूंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि इषा झा या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मात्र, पोलिसांनी अद्यापही आरोपींना अटक केली नसून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे, अशी माहिती समोर येत आहे.