माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची राजकारणातून निवृत्ती, राजकरणात खळबळ
Harshvardhan Jadhav (Photo Credits: PTI)

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकरणातून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. हर्षवर्धन यांनी याबाबत एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली असून यापुढे त्यांची उत्ताराधिकारी पत्नी असेल असे सुद्धा स्पष्ट केले आहे. मात्र हर्षवर्धन यांनी अचानक राजकराणातून काढता पाय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. तर नुकतान हर्षवर्धन यांनी मनसे पक्षात प्रवेश केला होता. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे हर्षवर्धन जाधव हे जावई आहेत.

हर्षवर्धन जाधव यांनी व्हिडिओ जाहीर करत असे म्हटले आहे की, लॉकडाउन सुरु असल्याने प्रत्येक जण आपापले छंद जोपासत आहेत. त्यामुळे मी सुद्धा माझा आधात्मिक छंद जोपासला. पण त्यातून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला झाल्याचे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. म्हणूनच राजकरणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यापुढे हर्षवर्धन यांच्या राजकरणाची उत्तराधिकारी संजना जाधव असणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना जे काही प्रश्न आहेत त्यांनी संजना हिच्याकडून सोडवून घ्यावेत अशी विनंती हर्षवर्धन यांनी केली आहे.(बीड: भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यावर संचारबंदीच्या नियमांचे पालन उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल)

हर्षवर्धन यांनी पुढे बोलताना असे म्हटले आहे की, प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात. आमच्या सुद्धा घरात झाल्या आहेत. पण याचा अर्थ असा नाही की त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडत असतील. परंतु आता संजना हिच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय हर्षवर्धन यांनी घेतला आहे. त्यामुळे यापुढे सर्व राजकीय, सामाजित किंवा शासकिय मदतीसाठी संजना यांना संपर्क करावा असे ही हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, 2009 मध्ये हर्षवर्धन जाधव हे मनसेच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबादमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला.