Sanjay Pandey | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक (DGP) संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्यासह सात जणांविरुद्ध ठाणे शहर पोलिसांनी (Thane Police) खंडणी, बनावटगिरी आणि इतर गंभीर आरोपांखाली एफआयआर नोंदवला आहे. सोमवारी (26 ऑगस्ट) दाखल आलेला हा गुन्हा मुंबईस्थित व्यापारी संजय पुनमिया यांच्या तक्रारीवरून झाला आहे. तक्रारदाराने आरोप केला आहे की, मे 2021 ते 30 जून 2024 या कालावधीत त्यांना संजय पांडे यांच्याकडून छळाचा सामना करावा लागला.

खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची कथीत धमकी

एफआयआरमध्ये संजय पांडे यांच्यासोबत सहआरोपी म्हणून निवृत्त एसीपी सरदार पाटील, पीआय मनोहर पाटील, अधिवक्ता शेखर जगताप, श्यामसुंदर अग्रवाल, सुभम अग्रवाल आणि शरद अग्रवाल यांची नावे आहेत. तक्रारीत झालेल्या उल्लेखानुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल केलेला 2016 चा गुन्हा पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आला आहे. पुनमिया आणि इतर व्यावसायिकांना कथीतरित्या पांडे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडून पैसे उकळले. कोर्टाची फसवणूक करण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रे बनवली आणि विशेष सरकारी वकील म्हणून भूमिका मांडल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. (हेही वाचा, माजी पोलिस आयुक्त Sanjay Pandey विधानसभा निवडणूक लढणार, वर्सोवा विधानसभा मतदार संघातून लढण्याची शक्यता)

भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल

एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) अनेक कलमांचा समावेश आहे, जसे की लोकसेवक गैरवर्तनासाठी कलम 166(a), तोतयागिरीसाठी कलम 170, गुन्हेगारी कट रचण्यासाठी कलम 120B, गुन्हेगारी धमकी. खोट्या पुराव्यासाठी कलम 193 आणि खोटेपणा, खंडणीशी संबंधित इतर आरोपांवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, Sanjay Pandey Meet Uddhav Thackeray: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि उद्धव ठाकरे यांच्यात 'मातोश्री'वर भेट)

मी काहीही चुकीचे केलेले नाही पांडे

संजय पांडे यांनी दाखल एफआयआर आणि आरोपांना उत्तर देताना प्रसारमाध्यमांसी बोलताना सांगितले की, मला आत्ताच तक्रारीची माहिती मिळाली आहे. मी काहीही चुकीचे केलेले नाही. मी अद्याप एफआयआर पाहिलेला नाही. ठाणे गुन्हे शाखा सध्या या आरोपांचा तपास करत असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे

दरम्यान, वृत्तसंस्था एएनआयने ठाणे पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ठाणे पोलिसांनी महाराष्ट्राचे माजी डीजीपी संजय पांडे यांच्यासह 7 जणांविरुद्ध अनियमितता आणि खंडणीच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे. मुंबईतील व्यापारी संजय पुनमिया यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, मे 2021 ते 30 जून 2024 दरम्यान आरोपींकडून आपल्याला छळाचा सामना करावा लागला. महाराष्ट्राचे माजी डीजीपी संजय पांडे, निवृत्त एसीपी सरदार पाटील, पोलिस अधिकारी मनोहर पाटील, अधिवक्ता शेखर जगताप, श्यामसुंदर अग्रवाल, सुभम अग्रवाल, शरद अग्रवाल व इतर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.