माजी कॉंग्रेस आमदार निर्मला गावित आज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता
Nirmala Gavit (Photo Credits: Facebook/ PTI)

महाराष्ट्रात पुढील काही महिन्यातच महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता नाराज इच्छुक उमेदवारांचे पक्षांतर सुरू झाले आहे. नाशिक मधील माजी कॉंग्रेस आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit)  या देखील लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार आज (21 ऑगस्ट) निर्मला गावित यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होऊ शकतो. काल त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला आमदारकीचा राजीनामा सादर केला आहे.

निर्मला गावित यांचा शिवसेना प्रवेश कालच होणार होता मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे कार्यकरम रद्द झाला. निर्मला गावित यांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते मुंबईत पोहचणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. निर्मला गावित यांच्या कॉंग्रेस पक्षाला राम राम ठोकण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात सध्या कमजोर होत असलेल्या कॉंग्रेस - राष्ट्रवादी पक्षाला हा आणखी एक मोठा धक्का असल्याचे समजले जात आहे. नाशिक: आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसणार? युतीच्या वाटेवर दोन बडे नेते जाण्याची शक्यता

निर्मला गावित या नाशिकमधील इगतपुरी विधानसभा मतदार संघातून मागील 10 वर्षांपासून निवडून येत आहेत. निर्मला गावित या कॉंग्रेस नेते माणिकराव गावित यांच्या कन्या आहे. माणिकराव गावित देखील नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून 9 वेळा निवडून आले आहेत.