देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सामानाची बांधाबांध; आज दुपारी 'वर्षा' बंगला सोडणार
Former Chief Minister Devendra Fadnavis With Amruta Fadnavis | | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

मुखमंत्री (Chief Minister ) पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारी निवासस्थान असलेला 'वर्षा' बंगल्यावर सामानाची बांधाबांध करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपला होता. मात्र, राज्यात निर्माण झालेला घटनात्मक पेच आणि लागू झालेली राष्ट्रपती राजवट यांमुळे फडणवीस यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मर्यादीत जबाबदारी होती. त्यामुळे त्यांनी 'वर्षा' बंगल्यावरील मुक्काम कायम ठेवला होता. मात्र, आता सत्तांतर झाल्याने देवेंद्र फडणीस यांना 'वर्षा' बंगला (Varsha Bungalow) खाली करावा लागणार आहे. त्या दृष्टीने त्यांनी सुरुवातही केली असून, आज (29 नोव्हेंबर 2019) दुपारपर्यंत ते बंगला खाली करतील असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

'वर्षा' बंगला हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील अनेक महत्त्वाचे निर्णय आणि राजकीय डावपेचांचा साक्षीदार राहिला आहे. वर्षा बंगल्याचे वैशिष्ट्य असे की गेली अनेक वर्षे हा बंगला महाराष्ट्राचे राजकारण आणि राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांचा कारभार मूकपणे पाहात आला आहे. 'वर्षा' बंगला हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान आहे. राज्याचे मुख्यमंत्री या बंगल्यावर निवासाला असतात. राज्यातील असे खूप कमी मंत्री आहेत ज्यांनी वर्षा बंगल्यावर सलग पाच वर्षे मुक्काम ठोकला आहे. अलिकडील काही वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस हे सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मंत्रालयात स्वीकारणार पदभार)

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-राष्ट्रीय काँग्रेस असा तिन्ही पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकासआघाडी सरकारचे ते नेतृत्व करत आहेत. परंपरा आणि निमांनुसार राज्याचे मुख्यमंत्री 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी राहतात. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावरच राहायला पाहिजे हे बंधनकारक नसले तरी, मुंबईबाहेरील मुख्यमंत्री या निवासाचा वापर करत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान मातोश्री आहे. ते मुंबईतच आहे. त्यामुळे ठाकरे हे सरकारी निवासस्थान वापरणार की शासकीय याबाबत उत्सुकता आहे. तुर्तास मात्र, देवेंद्र फडणवीस यांना 'वर्षा' बंगल्यातून काढता पाय घ्यावा लागत आहे.