मिरा भाईंदर येथील अपक्ष आमदार गीता जैन (Geeta Jain) यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप बनावट असल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी नवघर पोलिसांनी भाजपाच्या महिला पदाधिकारी रंजू झा यांना अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयाने रंजू झा यांची जामिनावर सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणू हा केवळ घोटाळा असून नागरिकांकडून पैसे उकळण्यासाठी पॉझिटिव्ह असल्याचे दाखवले जात आहे, अशी ध्वनीफित आमदार गीता जैन यांच्या नावाने व्हायरल करण्यात आली होती.
केंद्राकडून एका रुग्णामागे दीड लाख रुपये मिळतात. त्यामुळेच पैसे उकळण्यासाठी रुग्ण संख्या फुगवली जात आहे, रुग्णांना पॉझिटिव्ह दाखवले जात आहे आणि हा मोठा घोटाळा आहे, असे वक्तव्य गीता जैन यांनी केल्याचे भासविण्यात आले होते. हे स्वत: गीता जैन यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नवघर पोलिसांकडे धाव घेऊन सर्व प्रकार सांगितला. नवघर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करून रंजू झा या महिलेला अटक केली आहे. रंजू झा या भारतीय जनता पक्षाच्या उत्तर भारतीय महिला मोर्चाच्या मीरा भाईंदर मतदारसंघाच्या उपाध्यक्ष आहेत. तसेच न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे, अशी माहिती समोर येत आहे. हे देखील वाचा- शांताबाई पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून 1 लाख रुपयांची मदत; रस्त्यावर पोटासाठी करायच्या कसरत
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना काहीजण समाजात संभ्रण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर चुकीची माहितीचा प्रसार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. ट्विटर व अन्य सोशल मिडियावर येणाऱ्या व कोणत्याही सेलिब्रिटी किंवा ब्लू टीक व्हेरिफाईड अकाउंटने एखादी बातमी ट्विट किंवा शेअर केली तर आंधळेपणाने ती रिट्विट किंवा रिशेअर करू नका. आधी सदर बातमीची खातरजमा करून घ्या, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने नागरिकांना केले आहे.