File Image | Amit Shah | PM Narendra Modi (Photo Credits: PTI)

मोठ्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात महायुतीची घोषणा झाली. येत्या विधानसभेसाठी (Assembly Elections 2019) भाजप (BJP) 164 जागा लढवणार आहे. तर शिवसेना (Shiv Sena) 124 जागा लढवणार आहे. भाजपने तोडफोडीचे राजकारण करत लोकसभेप्रमाणे ही निवडणूकही मोठ्या उंचीवर नेवून ठेवली आहे. त्यामुळे महायुतीसोबतच  विरोधी पक्षानेत्यांसाठीही ही निवडणूक फार महत्वाची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराचा धुरळा उडवण्यासाठी थेट पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांची मदत घ्यायची ठरवली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्या 10, अमित शाह यांच्या 20 तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तब्बल 65 सभा राज्यात होणार आहेत. निवडणुकांच्या आधी भाजपने राज्यात महाजनादेश यात्रेचे आयोजन केले होते. त्यानंतर आता प्रचाराच्या सभांमध्ये थेट नरेंद्र मोदी आणि अमित शाह सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे अमित शाह पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. शिवसेनेने आपल्या आमदारांचा रोष पत्करून युतीला मान्यता दिली. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती तुटल्याचा फायदा कॉंग्रेस आणि एनसीपीला होणार आहे. यामुळे शिवसेनेची ताकद वाढू न देता राज्यातील इतर विरोधी पक्षांना तोंड देण्यासाठी या दोन मोठ्या नेत्यांची भाजपला फार मदत होणार आहे. (हेही वाचा: युतीच्या जागावाटपात शिवसेना पक्षाच्या वाट्याला आलेल्या 124 मतदारसंघांची नावे)

मोदी-शहा यांच्या सभा काही महत्वाच्या नेत्यांच्या मतदारसंघात होणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, गिरीश महाजन, उदयनराजे भोसले इ. यांचा समावेश आहे. मोदी-शहा यांच्यासोबतच राजनाथ सिंह, नितीन गडकरी, पियुष गोयल यांच्यादेखील सभांचे आयोजन करण्यात आले आहे. अशाप्रकारे जोरदार शक्ती प्रदर्शन करत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी भाजपने मोठा प्लान आखला आहे.