मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करताना स्वयंसेवी संस्थांनी (NGO) मुंबईत विशेषत: झोपडपट्ट्यांमध्ये वॉर्डनिहाय पथक स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात. घरोघरी जाऊन तपासणी करावी आणि कोरोनामुक्त मुंबईच्या कामात जिद्दीने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले आहे. मुंबईतील झोपडपट्टी भागात कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविणे तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारावर उपचार करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, यावेळी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस.चहल, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनात एकजूट असेल तर आपण कोरोनाचे संकट नक्कीच परतवून लावू शकतो. चेस द व्हायरस चे काम महापालिका करत आहेचं. ते ज्या ठिकाणी काम करत आहेत ती ठिकाणे सोडून इतर ठिकाणी 'चेस द व्हायरस' ही संकल्पना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबवावी आणि प्रत्येक वस्तीमधील नागरिकांची तपासणी केली जावी, त्यासाठी त्यांना आवश्यक असलेले साहित्य पुरवण्यात यावे, अशा सुचनादेखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्या. (हेही वाचा - भटक्या जमाती 'क' प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेचे ‘अहिल्यादेवी होळकर आवास योजना’ नामकरण; विजय वडेट्टीवार यांची माहिती)
... @mybmc चे प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करताना स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत विशेषत: झोपडपट्ट्यांमध्ये वॉर्डनिहाय पथक स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात. घरोघरी जाऊन तपासणी करावी आणि #COVID_19 मुक्त मुंबईच्या कामात जिद्दीने सहभागी व्हावे- मुख्यमंत्र्यांचे आवाहन
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 9, 2020
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गावपातळीवर कोरोना दक्षता समित्या स्थापन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जग, राज्य, जिल्ह्याची चिंता करण्याआधी प्रत्येक गावाने आपले गाव, घर अंगण स्वच्छ ठेवण्याचे ठरवले तरी आपण कोरोनाला आणि पावसाळ्यातील आजारांना हरवू शकू. कोरोना आणि पावसाळ्यातील आजार दूर ठेवण्यासाठी स्वच्छतेच्या, मास्क, सॅनिटायझर वापरण्याच्या सुचनांचे पालन स्वयंसेवी संस्थांनी मुंबईतील वस्त्यांमधील जनतेला समजून सांगावे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. (हेही वाचा - 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने'अंतर्गत 2020-21 साठी 1 हजार 306 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता)
दिल्लीच्या केंद्रीय पथकाने मुंबईतील झोपडपट्टीची पाहणी केल्यानंतर तेथील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता हा विषय प्रामुख्याने मांडला होता. दिवसातून 6 वेळा सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण केल्याने धारावीसारख्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला नियंत्रणात आणता आला. त्यामुळे अशाचपद्धतीने डासांचे निर्मुलन करण्याकरिता आवश्यक असलेली धूर फवारणी करणे गरजेचे आहे. एकट्या महापालिकेला हे काम करणं शक्य नाही. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेऊन फवारणीचे काम करण्यात यावे. त्यासाठी महापालिकेने आवश्यक असलेली फवारणी यंत्रे स्वयंसेवी संस्थांना द्यावीत, अशा सुचनादेखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
याशिवाय स्वयंसेवी संस्थांच्या पथकाने घरोघरी जाऊन तपासणी करतांना लक्षणे दिसलेल्या रुग्णांना अधिकृत कोविड उपचार केंद्राकडे पाठवावे. तसेच लोकांच्या मनात विलगीकरणाबाबत असलेली भीती काढून टाकण्यासाठीचे मार्गदर्शन, ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि कॉरंटाईनच्या कामातही स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी, असं आवाहनही ठाकरे यांनी केलं.