Maharashtra Flood 2019: महाराष्ट्र पूर परिस्थिती पाहता विधानसभा निवडणूक पुढे ढकला, राज ठाकरे यांची मागणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो सौजन्य-फेसबुक)

मागील काही दिवसात कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara), सांगली (Sangali) परिसरात निसर्गाचा कोप झाल्याने समाजजीवनाची अक्षरशः दैना झाली.यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी  विधानसभा निवडणूक (Assembly Election) पुढे ढकलून थेट पुढच्या वर्षी घेण्याची मागणी केली आहे. सद्य परिस्थितीत लोकांची सोय करणे गरजेचे आहे आणि या तीव्रता पाहता यासाठी निदान सहा महिने लागतील असा अंदाज राज यांनी वर्तवला आहे. अशा वेळी जर का सरकारने निवडणुकांचा विचार केला तर अत्यंत लाजीरवाणी बाब ठरेल असेही राज यांनी म्हंटले आहे. यासंदर्भात ते काहीच दिवसात निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहेत.

राज यांनी मुलाखतीत बोलताना राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. शिवसेना आणि भाजपा पक्ष केवळ निवडणुकीचा विचार करत आहे यावरूनच त्यांना किती माज आलाय हे दिसत अशा शब्दात राज यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. पाऊस आणि पुराची परिस्थिती याचा अंदाज खरंतर सरकारला अगोदरच येणं गरजेचं होत, पण फडणवीस सरकारला केवळ आपणकिती जागा जिंकू याचा अंदाज वर्तवण्यातच रस आहे असाही टोला राज यांनी लगावला. याच पार्श्वभूमीवर पुरामुळे राज्यात रोगराई पसरण्याचे शक्यता आहे त्यामुळे निवडणूकांऐवजी सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे असे राज यांनी मत मांडले आहे.राज्यभरात पूरग्रस्त परिस्थितीत सलग सहाव्या दिवशी सुद्धा युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या कामात लष्कराला आधीपासूनच समाविष्ट करून घेण्याची गरज होती असेही राज यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत बोलताना निवडणूक हा आताच्या घडीला महत्वाचा विषय नाही, आता आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन हा मूळ उद्देश असल्याचे म्हंटले आहे. तसेच असा निर्णय घ्याचा झाल्यास त्यात राज्य सरकारचा नव्हे तर निवडणूक आयोगाचा निर्णय महत्वाचं असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.