गेल्या आठवड्यापासून अरबी समुद्रात तयार झालेल्या 'महा' (Maha) आणि 'बुलबुल' (Bulbul) चक्रीवादळाचा (Cyclone) परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला आहे. या चक्रीवादळामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आल्याने मासळीची आवक घटली असून, विविध माशांचे दर (Fish Rate) ३० टक्क्यांनी महागले आहेत. तसेच कुलाबा, पालघर, डहाणू, वसई यासारख्या भागांमध्ये समुद्रात मासेमारीवर बंदी घाल्याने माशांचा तुटवडा भासू लागला आहे. याचा सर्वात जास्त फटका मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.
मुंबईतील 'कुलाबा' आणि 'भाऊच्या धक्का' या दोन ठिकाणाहून मुंबई उपनगर, ठाणे या ठिकाणी माशांची आवक होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून चक्रीवादळामुळे मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात जाता आले नाही. त्यामुळे माशांच्या पुरवठ्यात घट झाली आहे. त्यामुळे माशांच्या किमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच माशांच्या पुरवठ्यात ६० ते ७० टक्क्यांनी घट झाल्याचे विक्रत्यांनी सांगितले आहे.
(हेही वाचा - ‘महा’ चक्रीवादळाचा मासेमारीला फटका; खराब हवामानामुळे 90 दिवसांपासून मासेमारी व्यवसाय बंद)
गेल्या महिन्यातील माशांचे दर आणि आताचे दर -
मासे प्रतिकिलो दर आताचा दर प्रतिकिलो
बोंबिल १५० रुपये २०० रुपये
कोंळबी ४०० रुपये ५०० रुपये
पापलेट ६०० ते १२०० ८०० ते १५००
सुरमई ५५० रुपये ८०० रुपये
माशांच्या किमतीत प्रति किलोमागे १०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. गेल्या महिन्यात क्यार आणि महा चक्रीवादळामुळे मासेमारांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, मासेमारांना सरकाराने शेतकऱ्यांप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी काही मच्छीमारांकडून करण्यात आली होती.