Mumbai Coastal Road Update: कोस्टल रोडचा पहिला टप्पा जानेवारी अखेर खुला होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबईकरांना दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट नव्या वर्षात मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज सांगितले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Mumbai Trance Harbour Link) आणि कोस्टल रोड (Costal Road) या दोन्ही प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. एमटीएचएलपाठोपाठ कोस्टल रोडचा पहिला टप्पा जानेवारी महिन्याच्या अखेरीस खुला होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुंबईत (Mumbai) आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबई डीप क्लीन मोहिमेत मुख्यमंत्री सहभागी झाले. सकाळपासून चर्नी रोड, मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट याठिकाणी ही मोहीम राबवतानाच मुख्यमंत्र्यांनी त्याचा विस्तार वाढवत एमटीएचएल आणि रायगड जिल्ह्यातील चिर्ले येथेही स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला. (हेही वाचा - CM Eknath Shinde On Coastal Road: जानेवारीत मुंबई कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा)

कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील बोगद्याचे काम झाले असून दुसऱ्या टप्प्यातील बोगदा मे अखेरपर्यंत पूर्ण होईल. या बोगद्याचा आकार देशातील सर्वात मोठा असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. कोस्टल रोडवर टोल नाही असे सांगत मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणारा हा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.