बांद्रा पोलिसांनी, बांद्रा वरळी सी लिंक जवळील तरंगते हॉटेल मुंबई मेडेन (Mumbai Maiden) चे मॅनेजर आणि सुपरवायझर यांना अटक केली आहे. सोमवारी रात्री ख्रिसमस उत्सवाच्या वेळी डेकवर फटाके फोडण्याच्या गुन्ह्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे. संजीव अग्रवाल आणि मनोज मुलचंदानी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी डेकवर ख्रिसमस उत्सव साजरा करण्यासाठी मध्यरात्री एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
मंगळवारी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यात या तरंगत्या हॉटेलमध्ये फटाके फोडण्यात येत असल्याचे दिसून आले. महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB)चे सीईओ विक्रम कुमार यांनी सांगितले की, ‘एमएमबी अशा प्रकारच्या आतिषबाजीसाठी परवानगी देत नाही. मात्र या प्रकरणात पोलिसांची परवानगी घेतली होती का, आणि ही आतिषबाजी करताना आवश्यक ती सावधगिरी बाळगली होती का याची चौकशी केली जाईल’. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दाखल घेत, एमएमबीने मुंबई मेडेनला अशा प्रकारच्या प्रायव्हेट पार्टीमध्ये फटके फोडण्याची परवानगी आहे का नाही हे तपासण्याचे आदेश दिले आहेत. (हेही वाचा : 'अंग्रिया' मुंबई-गोवा आलिशान क्रुजवर कॅप्टनच्या उपस्थितीत पार पडलं लग्न !)
संजीव अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, ‘ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जगभरात विविध ठिकाणी अशा प्रकारे जहाजांवर फटके फोडले जातात, त्यात काही गैर नाही. याबाबतीत आमच्या जहाजावर सर्व प्रकारची सावधगिरी बाळगण्यात आली होते.’ मात्र अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाण्यावर अशा प्रकारचे फटाके फोडण्यास परवानगी दिली जात नाही. तुम्ही फक्त जमिनीवरच फटाके फोडू शकता.