निवडणूक आयोगाला जेलमध्ये पाठवण्याचा इशारा; प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
Prakash Ambedkar (Photo Credits-Twitter/ANI)

बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे आपल्या वक्त्यव्यामुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नुकतेच त्यांनी यवतमाळच्या सभेत निवडणूक आयोगाबद्दल एक वक्त्यव्य केले होते, या आक्षेपार्ह विधानाबद्दल प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये गुन्हा नोंदविला आहे. दिग्रस पोलीस ठाण्यामध्ये भादंवि कलम 503, 506, 189 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या सभेमध्ये आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि कॉंग्रेस यांच्यावरही सडकून टीका केली होती.

‘पुलवामा घटनेवर काही बोलले की निवडणूक आयोग बंदी लावते. ही यंत्रणा भाजपच्या हातातील बाहुले आहे. त्यामुळे आम्ही जर का सत्तेत आलो तर यांना तुरुंगात पाठवू’ असे आक्षेपार्ह विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. तसेच निवडणूक आयोग हा भाजपचा मित्रपक्ष असल्याप्रमाणे वागत आहे. सध्याचे भाजपा सरकार बिनडोकांचे सरकार असून त्याचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघेही महाडाकू आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. निवडणूक आयोगाने या विधानांची चांगलीच दाखल घेतली असून, याबाबत कारवाई करण्यात आली आहे. (हेही वाचा: प्रकाश आंबेडकर यांच्या सभेत ‘छोटा पाकिस्तान’ असा उल्लेख; कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल)

याधीही आंबेडकर यांचे कट्टर समर्थक आणि माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड (Pramod Gaikwad) यांनी आपल्या भाषणादरम्यान 'छोटा पाकिस्तान' असा  उल्लेख केला होता. या उल्लेखाबद्दल गायकवाड यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त लोकसत्ताने दिले होते. दरम्यान सोलापुरमध्ये सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. तर, डॉ. जयसिद्धेश्वर महाराज हे भाजप उमेदवार आहेत. त्यामुळे अॅड. प्रकाश आंबेडकर, सुशिलकुमार शिंदे आणि डॉ. जयसिद्धेश्वर महाराज असा सामना रंगणार आहे.