Mohit Kamboj (Photo Credits-ANI)

महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना काल अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ने अटक केली आहे. या घटनेमुळे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी ही गोष्ट साजरी केली, त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित कंबोज यांनी 23 तारखेच्या संध्याकाळी त्यांच्या सांताक्रूझ निवासस्थानी कोविड नियमांचे उल्लंघन करून आपल्या समर्थकांची मोठी गर्दी जमवली होती.

यासोबतच सार्वजनिक ठिकाणी हवेत तलवार फिरवली, जी गोष्ट शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत येते. आता काम्बोज यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि 268, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(c) आणि 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारच्या सांगण्यावरून पोलिसांनी मुद्दाम आपल्याविरुद्ध एफआयआर दाखल केला असल्याचे कंबोज यांनी सांगितले आहे.

दहशतवादी दाऊद इब्राहिमसंबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक बुधवारी सकाळी 4 वाजता नवाब मलिक यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना कार्यलयात घेऊन गेले. त्यानंतर नवाब मलिक यांना साधारण 3 वाजता अटक करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते तपासात सहकार्य करत नव्हते.

सेंट्रल एजन्सीने असा आरोप केला आहे की नवाब मलिक यांनी सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून, बनावट कागदपत्रे बनवून कुर्ल्यातील मुनिरा प्लंबरची मुख्य मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केला, ज्याचे सध्याचे बाजार मूल्य 300 कोटी रुपये आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, मलिक यांनी हसिना पारकर, तिचा अंगरक्षक सलीम पटेल आणि 1993 बॉम्बस्फोटातील दोषी सरदार शाह वली खान यांच्या संगनमताने हे केले होते. (हेही वाचा: अटकेनंतर नवाब मलिकांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही - चंद्रकांत पाटील)

न्यायालयाने नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. ईडीच्या रिमांड कॉपीमध्ये म्हटले आहे की, ‘नवाब मलिक यांच्या चौकशीतून त्यांच्या विशेष अधिकारक्षेत्रातील महत्त्वाची तथ्ये उघड होऊ शकतात.'