राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा शहर चिटणीस (Thane District City Secretary) मनोज कोकणे (Manoj Kokane) यांनी पक्षाच्या झेंड्याने पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी मनोज कोकणे यांच्यासह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार ठाण्यातील दिवा येथे घडला.
दरम्यान, या प्रकरणी मनोज कोकणेसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती दिली आहे. मनोज कोकणे हे ठाण्यातील दिवा येथे राहतात. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता निलेश कापडणे याला काही दिवसांपूर्वीच क्षुल्लक वादातून काही रिक्षा चालकांनी मिळून मारहाण केली होती. निलेश कापडणे याला मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करून अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मनोज कोकणे हे 20 ते 25 जणांचा जमाव घेऊन रस्त्यावर उतरले. (हेही वाचा - Jumbo COVID19 Hospitals In Pune: पुण्यातील पहिल्या जम्बो रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन)
यावेळी त्यांनी रास्ता रोको करून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले. यावेळी मनोज कोकणे यांनी पोलीस उपनिरीक्षक सचिन सरडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा असलेल्या काठी आणि छत्रीने मारहाण केली.
पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी मनोज कोकणे यांच्यासह 5 जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मनोज कोकणे, विजय वाघ, सूर्यकांत कदम, हिमांशू कदम, राहुल शिंदे, भारती कोकणे, सारिका झरेकर आणि किरण ताटेसह काही अज्ञात व्यक्तीविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय या पाच जणांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.