Female Doctor Molested: पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयामध्ये (Jumbo Covid Hospital) एका महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिला डॉक्टरने केली आहे. याप्रकरणी दोन्ही डॉक्टरविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश भद्रा आणि अजय बागलकोट, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एक महिन्यापासून हे दोन्ही डॉक्टर्स पीडित महिला डॉक्टरला उद्देशून अश्लिल बोलत होते. परंतु, याकडे महिला डॉक्टरने दुर्लक्ष केलं. मात्र, त्यानंतरच्या काळातदेखील डॉक्टरांचा त्रास वाढत गेला. त्यामुळे पीडितेने यासंदर्भात पोलीस ठाण्यात दोघा डॉक्टरांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. (हेही वाचा - Covid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार)
पुण्यातील जम्बो रुग्णालय आतापर्यंत विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरलं आहे. यापूर्वी जम्बो रुग्णालयातून 33 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली होती. ही महिला शनिवारी पिरंगुटच्या घाटात सापडली. या महिलेसंदर्भात बातम्या प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेचा शोध लागला.
पुण्यातील जम्बो रुग्णालयात कोरोनावर योग्य उपचार होत नसल्याच्या तक्रारीदेखील यापूर्वी नोंदवण्यात आल्या आहेत. तसेच उपचाराअभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील जम्बो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न तसेच तेथे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.