Thane: धक्कादायक! नाश्ता न दिल्याच्या रागातून सासऱ्याने सुनेवर झाडली गोळी
Shooting | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Thane: ठाणे हद्दीतील राबोडी पोलीस ठाण्याच्या (Rabodi Police Station) हद्दीत नाश्ता न दिल्याने संतापलेल्या सासऱ्याने (Father-in-law) सुनेवर (Daughter-In-Law) गोळी झाडली. गोळी लागल्याने सून जखमी झाली. पोलिसांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली आहे. राबोडी भागातील रहिवासी असलेल्या 42 वर्षीय महिलेच्या पोटात गोळी लागली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी आरोपी काशिनाथ पांडुरंग पाटील (वय, 76) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) तसेच शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. (हेही वाचा - Thane: 5 लाखांच्या बहाण्याने केली 1 लाखांची फसवणूक, ठाण्यात ऑनलाइन गुंडांनी या गरीबाला बनवला बळी)

आरोपीच्या दुसऱ्या सुनेच्या तक्रारीचा संदर्भ देत पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, जेव्हा पीडितेने चहासोबत नाश्ता दिला नाही, तेव्हा आरोपीला राग आला. वृद्धाने आपले रिव्हॉल्व्हर काढले आणि सुनेवर गोळी झाडली. गोळी लागल्याने पीडिता जखमी झाली, असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले आहे. सासरच्या मंडळींनी हा हल्ला अन्य कोणत्यातरी चिथावणीतून केला आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत.