Accident on Atal Setu (फोटो सौजन्य - x/@timesofindia)

Accident on Atal Setu: अटल सेतूवर (Atal Setu) भीषण अपघात (Accident) झाल्याची बातमी समोर येत आहे. शुक्रवारी सकाळी अटल सेतूवर भाड्याने घेतलेल्या एसयूव्ही चालकाचा गाडीवरील ताबा सुटून तो डंपरला धडकला. प्राथमिक चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसून आले की चेंबूर येथील रहिवासी पुनीत सिंग माजरा हा ताशी 180 किमी वेगाने गाडी चालवत होता. पोलिसांनी महामार्गावर तैनात असलेल्या जलद प्रतिसाद पथकाची मदत घेऊन अपघातग्रस्त गाडीतून मृतदेह बाहेर काढला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिअल इस्टेट एजंटचा मुलगा पुनीत माजरा हा पहाटे 2.30 वाजता अटल सेतूच्या उत्तरेकडील लेनवर पनवेलकडे जाणाऱ्या बीएमडब्ल्यू एक्स1 मॉडेलची गाडी चालवत होता. त्यावेळी त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि तो डंपरला धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, या घटनेत कारचा मलबा डंपरमध्ये अडकला. या घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारची धडक वेगाने झाल्यामुळे डंपरचेही नुकसान झाले. (हेही वाचा, Oshiwara Road Accident: मुंबईत मर्सिडीज कारच्या धडकेत 19वर्षीय फूड डिलेवरी बॉयचा मृत्यू; चालक अटकेत)

पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी गाडीचा दरवाजा उघडून चालकाला बाहेर काढले. त्यानंतर त्याला कामोठे येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी सांगितले की पुनीत सिंगच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, ओळखपत्रावर मृत तरुणाची वैयक्तिक माहिती आढळली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. (हेही वाचा, Delhi Hit and Run Case: दिल्ली मध्ये मर्सिडीज कारच्या धडकेत 34 वर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू)

दरम्यान, तरुणाने मद्यपान केले होते की, नाही हे निश्चित करण्यासाठी पोलिसांनी त्याचे रक्ताचे नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. डंपर चालकाच्या तक्रारीवरून, पोलिसांनी माजरा यांच्यावर निष्काळजीपणा, बेदरकारपणे गाडी चालवणे आणि जीव धोक्यात आणणे या कारणांमुळे मृत्यू झाल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.