Beed Accident: लग्नाचा बस्ता बांधून घरी जात असताना काळाचा घाला, भावी नवरदेवासह बहिण आणि भाचीचा जागीच मृत्यू
Accident (PC - File Photo)

Beed Accident: बीडमध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अंबाजोगाई लातूर महामार्गावर अपघात झाला आहे. एसटी बस आणि दुचाकीची धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. लग्नाच्या घरात अपघातामुळे दुखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेमुळे गावात एक शोककळा पसरली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. (हेही वाचा- तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा मृत्यू; महाबळेश्वर येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नासाठी बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहिण आणि लहानग्या भाचीचा अपघातात मृत्यू झाला. सेवालाल पंडित राठोड (२१), बहिण दिपाली सुनील जाधव (२०), भाची त्रिशा सुनील जाधव (१) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहे. सेवालालचं महिनाभरानंतर लग्न होते. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी दुकानात गेले होते. दुचाकीवर तिघे जण बसले होते. समोरून येणाऱ्या एसटीने दुचाकीला धडक दिली. या धडकेत नवरदेवासह दोघे जण जमिनीवर फेकले गेले. त्यांना गंभीर दुखापत झाली आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला.

लग्नाच्या घरात काळाने घात केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. वाघाळा पाटीजवळ समोर येणाऱ्या लातूर छत्रपती संभाजीनगर बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. घटनास्थळी रस्त्यावर बराच वेळ वाहतुकांची कोंडी झाली होती. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांनी एसटी चालकावर संताप व्यक्त केला आहे.