Farmers Suicides: 2020 मध्ये शेतकरी आत्महत्यांमध्ये 18% वाढ; महाराष्ट्रात घडल्या सर्वाधिक- NCRB
Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

2020 मध्ये देशाने कोरोना विषाणूच्या (Coronavirus) रूपाने एक भयानक महामारी पाहिली. कोरोनामुळे झालेले आर्थिक, शारीरिक, मानसिक नुकसान भरून काढणे तितकेसे सोपे नाही. या काळात ज्या लोकांची सर्वात जास्त फरपट झाली त्यामध्ये शेतकरी, मजूर, हातावरचे पोट असलेल्या लोकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही देशातील शेतकरी आत्महत्यांच्या (Farmers Suicides) बाबतीत घट झालेली दिसून येत नाही. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये शेतकऱ्यांच्या (शेतकरी आणि शेतमजूर) आत्महत्यांच्या घटनांमध्ये सुमारे 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर फक्त शेतमजुरांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 4,006 आत्महत्यांसह महाराष्ट्र पुन्हा एकदा आघाडीवर आहे.

यानंतर कर्नाटक (2,016), आंध्र प्रदेश (889), मध्य प्रदेश (735) आणि छत्तीसगड (537) मध्ये शेतीशी संबंधित लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने गुरुवारी 28 ऑक्टोबर रोजी भारतातील आत्महत्यांवरील आकडेवारी जाहीर केली. ती दर्शविते की शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत आहेत. एकंदरीत, 2020 मध्ये देशातील कृषी क्षेत्रात 10,677 लोकांनी आत्महत्या केल्या, जे देशातील एकूण आत्महत्यांपैकी 7% आहे (1,53,052).

2016 मध्ये एकूण 11,379 शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केल्या होत्या. 2017 मध्ये त्यात घट झाली आणि ही संख्या 10,655 झाली. 2018 मध्ये 10,349 आणि 2019 मध्ये 10,281 आत्महत्या झाल्या. 2020 मध्ये अशा प्रकरणांची संख्या 10,677 होती. गेल्या वर्षी भारतात सुमारे 1 लाख 53 हजार जणांनी आत्महत्या केल्या. ज्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच तब्बल 37 हजार रोजंदारी मजूर होते. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक तामिळनाडूचे मजूर होते. त्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण आणि गुजरातमधील मजूरांची संख्या आहे. (हेही वाचा: Double Murder In Byculla: अवघ्या 15 मिनिटांत दोघांची हत्या, भायखळा येथून संशयीत सायको किलर पोलिसांच्या ताब्यात)

2020 मध्ये देशात अपघाती मृत्यूची एकूण 3,74,397 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी सुमारे 35 टक्के लोकांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला आहे. 2020 मध्ये भारतात 3,54,796 रस्ते अपघातांची नोंद झाली, ज्यामध्ये 1,33,201 लोकांचा मृत्यू झाला आणि 3,35,201 जण जखमी झाले. अहवालात म्हटले आहे की 2020 मध्ये रेल्वे अपघातांची एकूण 13,018 प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामध्ये 1,127 लोक जखमी झाले आणि 11,968 लोकांचा मृत्यू झाला.