महाराष्ट्रातील सुमारे 21 जिल्ह्यातील शेतकरी आज मुंबई येथे राजभवनावर (Raj Bhavan) धडक देत आहेत. केंद्र सरकारने घाईगडबडीत संमत केलेले कृषी कायदे (Farm Laws 2020,) तातडीने मागे घ्यावेत अशी मागणी करत हे शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. राजभवनावर होणाऱ्या आंदोलनस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील नेते, मंत्रीही उपस्थित राहून पाठिंबा देणार आहेत. परंतू, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray ) हे मोर्चात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री हे पद घटनात्मक आहे. त्यामळे उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहू नये असे अवाहन शरद पवार यांनी केल्याचे समजते.
राजभवनावर निघणाऱ्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वात हा मोर्चा निघत आहे. महाराष्ट्रातील सुमारे 21 जिल्ह्यांमधून शेतकरी आणि कामगार हे मुंबई येथे दाखल झाले आहेत. दुसऱ्या बाजूला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या गोवा येथे आहेत. त्यामुळे राजभवनावर धडकणाऱ्या मोर्चाच्या शिष्ठमंडळाला ते भेटणार किंवा नाही याबबत साशंकता आहेत. राज्यपालांकडून शिष्टमंडळास भेटण्यासाठी आज सायंकाळी 5 वाजताची वेळ देण्यात आल्याचे समजते. (हेही वाचा, Farmers March In Maharashtra: संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा आज राजभवनावर धडकणार)
मुंबईत होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाही सतर्क झाली आहे. मोर्चास्थळी आणि गर्दीच्या स्थळी आरोग्य अथवा स्वच्छतेच्या प्राथमिक गरजांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या निर्माण होऊ नयेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने आवश्यक ती सेवा पुरवली आहे.
मोर्चाच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी मुंबई पोलीस सज्ज असून आवश्यक तो बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आझाद मैदानाभोवती सुमारे 100 पोलीस अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली पोलिसांच्या 500 तुकड्या तैनात केल्या आहेत. शिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या नऊ तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.