राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारवर कृषी कायद्यांवरुन (Farm Laws ) जोरदार हल्लाबोल केला आहे. चर्चेचे सर्व दरवाजे उघडे असताना केंद्र सरकारने कृषी कायद्यांबात कोणतीही चर्चा केली नाही. संसदेत कृषी कायद्यावर चर्चा करण्याची विरोधक आणि खासदारांची इच्छा असताना केंद्र सरकारने कोणतीही चर्चा केली नाही. घटनेची पायमल्ली करत सरकारने ठरवल्याप्रमाणे जसेच्या तसे हे कायदे मंजूर करुन घेतले. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. जो शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्थ करतो तो समाजकारणातून उद्ध्वस्त होतो, असा इशाराही शरद पवार (Farmers Protest, Tractor Rally) यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्याविरोधात मुंबई येथील आझाद मैदानात राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोर्चा (Farmers Protest) काढला आहे. या मोर्चात सहभागी होत शेतकऱ्यांन पाठिंबा देण्यासाठी शरद पवार आझाद मैदानात आले होते. या वेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात आलो आहे असे सांगत शरद पवार यांनी भाषणास सुरुवात केली. गेली 60 दिवस थंडी, उन, वारा, पाऊस असा कोणताही विचार न करता शेतकरी आज दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत उभा आहे. या आंदोलनात राज्यातीलही हजारो शेतकरी सहभागी आहेत. मात्र पंतप्रधान या शेतकऱ्यांना भेटायला गेला क? असा सवालही शरद पवार यांनी या वेळी उपस्थित केला. (हेही वाचा, Farmers March In Maharashtra: संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा आज राजभवनावर धडकणार)
सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. म्हणूनच ही लढाई सोपी नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केंद्र सरकारने जी भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो आहोत, असेही पवार या वेळी म्हणाले.
आंदोलक शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ राज्यपलांना भेटण्यासाठी राजभवनावर जाणार आहे. याबाबत राज्यपालांना कळवले असतनादखील राज्यपाल हे राजभवनात नाहीत. राज्यपाल हे गोव्यात आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यपाल आम्हाला पहिल्यांदाच भेटले आहेत, असा टोलाही शरद पवार यांनी या वेळी लगावला.