Farmers Protest: सरकारकडून अमानुषपणे शेतकऱ्याचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न; मराठी साहित्यिकांचा आरोप
Farmers protesting against the central government | (Photo Credits: PTI)

केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात (Farm Laws) शेतकऱ्यांजं दिल्लीत गेल्या पाच दिवसांपासून जोरदार आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी जमले आहेत. सरकारने विशेष अधिवेशन बोलावून कृषी कायदे रद्द करून टाकावेत, अन्यथा दिल्ली बंद करू, असा इशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे. तसेच कृषी कायद्याबाबत सरकारने पंजाब व्यतिरिक्त संपूर्ण देशातील शेतकऱ्यांशी बोलवून त्यांच्याशी चर्चा करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. यातच सरकारकडून अमानुषपणे शेतकऱ्याचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करत मराठी साहित्यिकांनी (Marathi Writers) दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा मताचा विचार न करता आणि त्यांना विश्वासात न घेता तीन कृषी कायदे अंमलात आणली आहेत. यामुळे पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांमध्ये जबरदस्त उठावाची भावना निर्माण झाली आहे. सगळे शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने दिल्लीत जमा झाले आहेत. सुरुवातीला सरकारकडून या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला. परंतु, निर्धाराच्या जोरावर हे सर्व शेतकरी आपापल्या मागण्यांवर ठाम आहेत, असे मराठी साहित्यिक आसाराम लोमटे यांनी मराठी साहित्यिकांची भूमिका मांडली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या भावनेकडे साफ दुर्लक्ष करुन सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणे, ही बाब अतिशय अमानुष आहे. गेल्या दोन अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचा असंतोष खदखदतोय. या काळात शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी सुद्धा या सरकारने पार पाडलेली नाही, असेही लोमटे म्हणाले आहेत. यासंदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Farmers Protest: Sikhs For Justice संघटनेकडून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना 10 लाख डॉलर्सची मदत जाहीर; एजन्सी झाल्या सतर्क

दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी यांनी म्हटले की, दिल्लीच्या लोकांनी संयम दाखवावा. तुम्हाला त्रास होत असल्याचेही सरकारला समजत आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडून चर्चेतून तोडगा काढावा, अशी विनंती त्यांनी शेतकऱ्यांना केली आहे. शेतकरी नेत्यांसोबत चर्चा सुरू असून उद्याही शेतकरी नेत्यांसमवेत बैठक आहे. आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले आहेत.