Instagram (PC - pixabay)

सोशल मीडीयामध्ये 'गोल्डन बॉय' (Golden Boy) नावाने लोकप्रिय असलेल्या मोनू बडेकर रील्स स्टारला चाहत्यानेच गंडा घातल्याचा एक प्रकार समोर आला आहे. 'तू लई मोठा रील्स स्टार आहेस, तुझी सगळी हवाच काढतो' असे म्हणत आरोपीने त्याच्याकडून 2 लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. रील स्टारची 18 तोळ्यांची चेन घेऊन नंतर ती परत देताना दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

महेश उर्फ मल्लाप्पा साहेबाना होस्मानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मेंद्र उर्फ मोनू बाळासाहेब बडेकर या रील्सस्टार सोबत हा प्रकार घडला आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीने फिर्यादी यांची १८ तोळे वजनाची सोन्याची चेन स्वतः घालण्यास घेतली होती. नंतर फिर्यादी यांनी ही चेन परत मागितली तेव्हा आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. असं पोलिसांनी सांगितलं आहे.

'तीन लाख रुपये दे, नाहीतर मी तुझी सोशल मीडियावर बदनामी करेल, चोरी केलेले सोने तुला देतो' असे सांगून आरोपीने फिर्यादीकडे तीन लाख रुपये खंडणीची मागणी केली. त्यावर फिर्यादीने दोन लाख रुपये आरोपीला दिले देखील होते. त्यानंतर देखील आणखी पैशाची मागणी करत आरोपीने सोशल मीडियावर फिर्यादीची बदनामी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.