Fake Placement Agencies: परदेशातील शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरी शोधत असल्यास व्हा सावध; वाढत्या फसवणुकीमुळे पोलिसांनी जारी केली मार्गदर्शक तत्त्वे
Fraud (Photo Credits: IANS) | Representational Image

गेल्या काही महिन्यांपासून बनावट प्लेसमेंट एजन्सींकडून (Fake Placement Agencies) फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यानंतर आता नवी मुंबई पोलिसांनी शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरी शोधणाऱ्या इच्छुकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पोलिसांनी इच्छुकांना नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी प्लेसमेंट एजन्सीची सत्यता तपासण्यास सांगितले आहे. अनेक फ्लाय बाय नाईट प्लेसमेंट एजन्सींनी नवी मुंबईत विशेषतः बेलापूर भागात कार्यालये उघडून परदेशातील शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरीचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली आहे.

नवी मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, फसवणूक करणाऱ्या कंपन्या तात्पुरते त्यांची कार्यालये स्थापन करून, गरजू लोकांना किंवा नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांना परदेशात नोकरीसाठी प्रभावित करतात आणि त्यांच्या बँक खात्यात मोठ्या रकमेची रक्कम जमा करण्यास सांगतात. ते उमेदवारांकडून पासपोर्ट आणि इतर आवश्यक कागदपत्रे देखील घेतात आणि परदेशी शिपिंग कंपन्यांसाठी बनावट करार आणि नामनिर्देशनपत्रे तयार करतात. अखेर पैसे आणि कागदपत्रे घेऊन कार्यालय बंद करून तेथून पळ काढतात.

अशी फसवणूक रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी जनजागृती मोहीम सुरू केली असून महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर लावले आहेत. अशी फसवणूक रोखण्यासाठी पोलिसांनी काही उपाय सुचवले आहे. जे विद्यार्थी किंवा तरुण परदेशी जहाजांमध्ये नोकरी किंवा प्रशिक्षण प्राप्त करू इच्छितात त्यांनी त्यांनी अधिकृत सागरी प्रशिक्षण संस्थेकडून आवश्यक प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रशिक्षण संस्थांसंबंधी माहितीची पडताळणी केंद्र सरकारच्या शिपिंग महासंचालनालयाच्या www.dgshipping.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून करता येईल. विद्यार्थ्‍यांनी कंपन्यांचा किंवा नागरिकांना प्रशिक्षण आणि नोकर्‍या देणार्‍या एजंटचा परवाना तपासणे आवश्‍यक आहे. हा परवाना महासंचालक शिपिंगद्वारे जारी केला जातो. (हेही वाचा: Nitin Gadkari On Lok Sabha Election Campaign: 2024 च्या लोकसभा निवडणूकीत ना बॅनरबाजी ना चहा देणार; पुन्हा गडकरींनी सांगितला 'ब्राईब फ्री' प्लॅन)

त्याचप्रमाणे, परदेशी जहाजे आणि इतर ठिकाणी नोकरी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकृत कार्यालयांकडूनच व्हिसा मिळवावा. याशिवाय, कंपनीचे मालक किंवा एजंट किंवा अन्य कोणतीही व्यक्ती RPSL च्या मान्यतेशिवाय परदेशी जहाजांवर किंवा परदेशात नोकरी देण्याचा दावा करत असल्यास, विद्यार्थ्यांनी तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करावी.