EVM Manipulating Attempt: छत्रपती संभाजी नगर मध्ये ईव्हीएम हॅक करून देण्याचं प्रलोभन देण्या प्रकरणात आर्मी जवान पकडला गेला रंगेहात
Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

ईव्हीएम हॅक (EVM Hack) च्या प्रकरणामध्ये छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मध्ये एका आर्मी जवानाला अटक करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांच्या भावाने सापळा रचून या जवानाला पोलिसांच्या जाळ्यात अडकवले. यासाठी त्याने अडीज कोटींची मागणी केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहरात जम्मूमध्ये तैनात असलेल्या लष्कराच्या जवानाला अटक करण्यात आली. जवानाच्या डोक्यावर कर्ज होते. त्याला ईव्हीएमची माहिती नव्हती, तो फसवणूक करण्याचा प्रयत्न करत होता. अंबादास दानवे यांची पुण्यात एकदा भेट झाली आणि त्यानंतर तो त्यांना भेटायला आणि पक्षनेत्याकडून पैसे घेण्यासाठी आला होता. यावेळी सापळा रचून त्याला पकडण्यात आले.

अंबादास दानवे हे आमदार आणि विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी 42 वर्षीय मारूती ढेकणे विरूद्ध तक्रार केली. एका चीप द्वारा ईव्हीएम हॅक करण्याचा त्याने प्लॅन दिला होता. या मध्ये एका विशिष्ट उमेदवाराला भरघोस मतं मिळवून देण्याचा प्लॅन त्याने दाखवला होता.

काल 7 मे दिवशी दुपारी 4 च्या सुमारास अंबादास दानवे यांचा भाऊ राजेंद्र दानवे यांनी त्याला मध्यवर्ती बस स्टॅन्ड जवळ भेटायला बोलावले होते. त्यावेळी या प्रकाराचा भांडाफोड झाला. चर्चेनंतर 1.5 कोटी रुपयांचा करार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. राजेंद्र दानवे यांच्याकडून टोकन रक्कम म्हणून एक लाख रुपये घेताना पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडले. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम 420 (फसवणूक) आणि 511 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील रहिवासी असून तो जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे तैनात होता.