Ratnakar Gutte | (Photo Credits: Facebook)

प्रवर्तन निदेशालय (Enforcement Directorate) या केंद्रीय तपास यंत्रणेने राष्ट्रीय समाज पक्ष आमदार रत्नाकर गुट्टे (RSP MLA Ratnakar Gutte) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने गुट्टे (Ratnakar Gutte) यांच्यावर कारवाई करत गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड (Gangakhed Sugar and Energy Ltd) सोबतच इतर तीन कंपन्या अशा मिळून सुमारे 255 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणला आहे. मनी लॉन्ड्रिंग कायद्यान्वये (Money Laundering Act) ईडीने गुट्टे यांची स्थायी आणि जंगम स्वरुपाती संपत्ती जप्त केली आहे.

ईडीने जप्त केलेली रत्नाकर गुट्टे यांची संपत्ती

  • गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड (Gangakhed Sugar and Energy Ltd
  • योगेश्‍वरी हेटचेरिश (Yogeshwari Hetcheries)

रत्नाकर गुट्टे यांच्यावर असलेले आरोप

रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर आरोप आहे की, गुट्टे यांनी आपल्या जीएसईपीएल (GSEPL)   कंपन्यांसाठी गरीब शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कृषी कर्ज काढून त्यांची फसवणूक (Agriculture Loan Fraud) केली. शेतकऱ्यांच्या नावे खोटे कर्ज काढून आर्थिक अफरातफर केलेल्या कंपनीविरुद्ध ईडी चौकशी करत आहे. त्या कंपन्यांवर ईडीने कारवाईही केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण 2012/13 ते 2016/17 या दरम्यानचे आहे. ईडने राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पोलीस स्टेशनमध्येही या प्रकरणात मे 2019 मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

चित्रपट निर्मात्याच्या घरावर छापा

रत्नाकर गुट्टे प्रकरणात ईडीने माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारीत 'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' चित्रपटाचे निर्माता विजय गुट्टे यांच्या घरावरही छापा टाकला होता. विजय गुट्टे हे रत्नाकर गुट्टे यांचे चिरंजीव आहेत. 6 बँकांसोबत केलेल्या सुमारे 238 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात ईडीने विजय गुट्टे यांच्यावर छापेमारीची कारवाई केली आहोती. ईडीने त्या वेळी म्हटले होते की, गुट्टे यांनी बँकांकडून कर्ज घेतले आणि त्यानंतर ते पैसे गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडकडे सोपवले. त्यांनी इतरही अनेक शेतकऱ्यांच्या नावे बनावट कर्ज घेतले होते. यातील अनेक शेतकरी त्यांच्या साखर कारखान्यात काम करत होते.

गुट्टे यांना कर्ज कोणी दिले?

ईडीने दिलेल्या माहिती म्हटले आहे की, गुट्टे यांना आंध्र बँक, यूको बँक, यूनाइटेड बँकऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, रत्‍नाकर बँक आदींनी 8-10 शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज दिले. कर्जात मिळालेली रक्कम बनावट खाती किंवा हायात नसलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर हस्तांतरीत केले.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या नावे बनावट कर्ज काढल्याचा मुद्दा तत्कालीन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विद्यमान सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सभाृहात उपस्थित केला होता. रत्नाकर गुट्टे हे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. सध्या ते रासप अध्यक्ष महादेव जानकर यांच्या सोबत आहेत.