Nitin Raut-Narendra Modi Cartoons| (Photo Credit : Twitter/@NitinRaut_INC)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी आणि त्याविरोधात केंद्र सरकारने राबविल्लेल्या उपाययोजना, लसीकरण मोहीम आदिंवरुन उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्यंगचित्र पोस्ट करत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. ही पोस्ट शेअर करताना 'अहंकाऱ्यांनो काहीतरी शिका' असा टोलाही त्यांनी पंतप्रधानांना लगावला आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील कोरोनाची दुसरी लाट काहीशी असरत असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात आणि देशात कोरोना संक्रमितांच्या संख्येत लगातार घट होताना दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने देशातील जनतेशी नुकताच संवाद साधला. या वेळी पंतप्रधानांनी जाहीर केले की, येत्या 21 जून पासून देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोनाची लस मोफत देण्यात येईल. पंतप्रधानांच्या घोषणेचे अनेकांकडून स्वागत करण्यात आले. काँग्रेसने आणि विरोधकांनी मात्र पंतप्रधानांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उर्जामंत्री नितीन राऊतांनीही पंतप्रधानांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे. (हेही वाचा, PM Narendra Modi यांच्या 2 मोठ्या घोषणा! 18 वर्षांवरील लोकांना लस आणि दिवाळीपर्यंत गरीबांना मोफत धान्य पुरवले जाणार, वाचा सविस्तर)

नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमचे नेते राहुल गांधी यांनी सुरुवातीलाच रस्ता दाखवला होता. राहुल गांधी यांनी कोरोना महामारीला सुरुवात होतानाच सरकारला इशारा दिला होता आणि सल्लाही दिला होता. नितीन राऊत यांनी पुढे 'अहंकाऱ्यांनो शिका' असा टोलाही लगावला आहे.

नितीन राऊत ट्विट

नितीन राऊत यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्यंगचित्रात दिसते की, राहुल गांधी हे पंतप्रधानांच्या हातात काठी देऊन रस्ता दाखवत आहेत. जसे अंध व्यक्ती काटी पकडून डोळस माणसापाठी येतो तसेच काहीसे या चित्रात दाखवण्यात आले आहे. हा प्रसंग बहुदा काँग्रेस कार्यालयातील भासावा असा आहे. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या मागे पाठिमागे कॉंग्रेस पक्षाचा लोगो दिसतो आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांनी या आधी ट्विटरवरु दिलेल्या सल्ल्याचा स्क्रिनशॉटही दिसतो आहे.