कोविड-19 संकटात बेरोजगारांना मोठा दिलासा; ऑनलाईन रोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टलमार्फत तब्बल 17 हजार 715 बेरोजगारांना रोजगार
Mahaswayam web portal (PC - Twitter)

कोरोना संकटामुळे राज्यात बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. मात्र, मागील 3 महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयंम वेबपोर्टलमार्फत तब्बल 17 हजार 715 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. मागील 3 महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर 1 लाख 72 हजार 165 बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना नवाब मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हेसुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येत आहे. (हेही वाचा - उद्धव ठाकरे यांची सामनामधील मुलाखत म्हणजे एक प्रकारे मॅचफिक्सिंगचं, धाडस असेल तर इतर वृत्त वाहिन्यांना मुलाखत द्या; चंद्रकांत पाटील यांची खोचक टिका)

दरम्यान, मागील 3 महिन्यात एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर 1 लाख 72 हजार 165 इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई विभागात 24 हजार 520, नाशिक विभागात 30 हजार 145, पुणे विभागात 37 हजार 562, औरंगाबाद विभागात 35 हजार 243, अमरावती विभागात 14 हजार 260 तर नागपूर विभागात 30 हजार 435 नोकरीइच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

विशेष म्हणजे यातील 17 हजार 133 उमेदवारांना नोकरी मिळविण्यात यश आले आहे. यात मुंबई विभागातील 3 हजार 720, नाशिक विभागातील 482, पुणे विभागातील 10 हजार 317, औरंगाबाद विभागातील 1 हजार 569 आणि अमरावती विभागातील 1 हजार 22 तर नागपूर विभागातील 23 उमेदवारांचा सहभाग आहे, अशी माहितीदेखील नवाब मलिक यांनी दिली आहे.