Mumbai: महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेने वेग पकडला आहे. राज्यात दररोज कोरोना संसर्गाची नोंद आहे, तर मुंबईत चोवीस तासांत 7 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, मुंबईस्थित कोविड सेंटरचा (Covid Center) एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये कर्मचारी दारू पार्टी करताना दिसत आहेत. यात हे कर्मचारी मद्यपान तसेच गांजा पिताना दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रशासनाने या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.
मुंबईतील कोरोना प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी राज्यभरात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला असून लॉकडाउनचीही तयारी करण्यात येत आहे. मात्र, अशात कल्याण-डोंबिवलीतील कोविड सेंटरमधील (Kalyan-Dombivali Covid Center) हे धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. (वाचा - Coronavirus in Mumbai: खासगी रुग्णालयातील बेड ताब्यात घ्या, मुंबई महापालिका प्रशासनाचे प्रभाग अधिकाऱ्यांना आदेश)
दरम्यान, कल्याण-डोंबिवलीतील कोविड सेंटरमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाईस सुरुवात केली आहे. सावळाराम क्रीडा संकुलातील कोविड सेंटर येथील दारू पार्टीची दखल घेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कंत्राटदाराला आरोपी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
कोविड सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांची दारू पार्टी सुरू असताना येथील एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ रेकोर्ड केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल गुलाम यांनी सांगितलं की, 'आम्ही या पार्टीमध्ये सामील असलेल्या एका कर्मचार्याला निलंबित केले आहे. इतर जण दवाखान्याच्या बाहेरचे होते.'