महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत राजधानी दिल्लीमध्ये मोठी खलबतं पाहायला मिळत आहेत. एका बाजूला शिवसेना (Shiv Sena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मोठ्या प्रमाणावर आमदारांना सोबत घेऊन गुजरातला गेल्याचे वृत्त आहे. हे सर्व आमदार सूरत येथील हॉटेल ली मेरीडीन येथे असल्याचेही समजते. दुसऱ्या बाजूला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीला रवाना झाले आहेत. तर केंद्रीय मंत्री अमित शाह ( Amit Shah) हे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. काही वेळात देवेंद्र फडणवीस हेदेखील या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 'दिल्लीत खलबतं महाराष्ट्रात पडसाद' अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदार आणि मंत्र्यांची संख्या प्रत्येक वेळी वेगवेगळी सांगितली जात आहे. एकनाथ शिंदे यांनीही अद्यापपर्यंत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. ते नॉट रिचेबलच आहेत. सांगितले जात आहे की, लवकरच ते पत्रकार परिषद घेणार आहेत. अद्याप पर्यंत तरी कोणतीही भूमिका अधिकृतरित्या शिंदे यांनी जाहीर केली नाही. पत्रकार परिषदेमध्ये ते आपली भूमिका जाहीर करतील असे मानले जात आहे.
दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या गोटातही प्रचंड हालचाल सुरु आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर आमदारांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीला कोणकोणते आमदार उपस्थित राहणार आणि कोणाची अनुपस्थिती असणार? याबाबतही उत्सुकता आहे. दरम्यान, निष्ठावान शिवसैनिक आणि पदाधिकारीही मोठ्या प्रमाणावर वर्षा बंगल्यावर उपस्थित झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतला आहे. या घडामोडी कोणत्या पातळीवर जाऊन पोहोचतात याबाबत मात्र प्रचंड उत्सुकता आहे. (हेही वाचा Maharashtra Political Crisis: कोण आहेत 'मातोश्री'चे निष्ठावंत मानले जाणारे एकनाथ शिंदे? ज्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला झटका, जाणून घ्या)
दरम्यान, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, भाजप म्हणजे भजनी मंडळ नाही. जर आम्हाला कोणी चांगला प्रस्ताव दिला तर आम्ही त्यांचा प्रस्ताव नक्की स्वीकारु. सत्ता मिळवणे आणि सत्तेद्वारे लोकांची सेवा करणे हेच राजकीय पक्षाचे काम असते. ते आम्ही करतो असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.