'कुणाला काहीही लिहून दिले नाही', अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खंडण
Ashok Chavan,Eknath Shind | (Photo credit: archived, edited, symbolic images)

किमान समान कार्यक्रम (Common Minimum Programme) ठरला आहे. त्यानुसार सरकार चालले आहे आणि त्याच आमच्या अटी-शर्थी आहेत. शिवसेनेने किमान समान कार्यक्रमाबाबत कुणालाही काही लिहून दिले नाही,असे स्पष्ट करत नगरविकास मंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या वक्तव्याचे खंडण केले आहे. दोन्ही नेत्यांनी परस्परविरोधी वधाने केल्यामुळे राज्यात महाविकासआघाडी सरकार कारभार हाकते आहे. सरकार चालले आहे. परंतू, सरकारमध्ये सर्वच काही अलबेल चालले नाही, असेही पुढे येत आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी 'कोणतेही घटनाबाह्य काम करणार नाही असे आम्ही शिवसेनेकडून लिहून घेतले आहे. मगच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. शिवसेनेने कोणतेही घटनाबाह्य किंवा उद्देशाबाहेरचे काम केले तरी आम्ही (काँग्रेस) सरकारमधून बाहेर पडू', असे म्हटले होते. अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याने शिवसेना गोटात नाराजी पसरली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने आपले वक्तव्य दिले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकार हे तिन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केले आहे. संविधानाच्या चौकटीत राहून काम करण्यास सरकार कटीबद्ध आहे. पण किमान समान कार्यक्रम वगळता कुणाला काहीही लिहून दिले नाही, असे स्पष्टपणे सांगत एकनाथ शिंदे यांनी अशोक चव्हाण यांचे विधान खोडून काढले आहे. (हेही वाचा, शिवसेनेनं जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू- अशोक चव्हाण)

अशोक चव्हाण यांनी म्हटले होते की, हे सरकार संविधानाच्या चौकटीत राहूनच काम करेन. जर असे घडले नाही तर, सरकारमधून काँग्रेस बहेर पडेल, असा सूचना सोनिया गांधी यांनी हे सरकार सत्तेवर येण्यापूर्वीच दिल्या आहेत. याची कल्पना शिवसेनेला देण्यात आली आहे. तसेच, कोणत्याही प्रकारचे घटनाबाह्य काम करणार नाही, असेही शिवसेनेकडून लिहून घेण्यात आले असल्याचे अशोक चव्हण यांनी नांदेड येथील सभेत बोलताना रविवारी म्हटले होते.