महाविकासआघाडी स्थापन झाली खरी मात्र तीन पक्ष एकत्र येऊन काम करणे ही साधीसुधी गोष्ट नाही हे एव्हाना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला कळालं असलेच. तशी महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये धुसफूसही सुरु आहे. याच धर्तीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. जर मित्रपक्ष शिवसेनेने उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदेडमध्ये बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्रात तीन पक्षाचे व तीन विचारांचे सरकार चालणार कसे?, असा सवाल करीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तीन पक्षाच्या सरकारला (महाविकास आघाडी) विरोध केला होता, परंतु, आम्ही सोनिया गांधी यांना राजी केले, असा गौप्यस्फोटही अशोक चव्हाणांनी या कार्यक्रमात केला.
हेदेखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार - संजय राऊत
त्यावेळी सोनिया गांधी यांना राजी केल्यानंतर घटनाबाह्य काम कऱणार नाही असे आम्ही शिवसेनेकडून लिहून घेतले होते. त्यामुळे सेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अशोक चव्हाणांनी दिला आहे.
त्यामुळे संविधानाच्या चौकोटीत राहून हे सरकार चालले पाहिजे. जर असे झाले नाही तर सरकारमधून बाहेर पडण्याच्या कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनेच्या बाहेर जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे, त्यामुळे आमचे सरकार व्यवस्थित सुरू आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.