Eknath Shinde Khed Rally: खेड मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेने काय उत्तर देणार? आमदार योगेश कदम यांच्याकडून टीझर जारी (Watch Video)
Eknath Shinde | (Photo Credit - Twitter)

कोकणात एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी गाजवलेले गोळीबार मैदान आता पुन्हा चर्चेमध्ये आले आहे. 5 मार्च 2023 ला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याच मैदानावरून गरजले होते. त्याच मैदानावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काय बोलणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. रामदास कदम आणि योगेश कदम (Yogesh Kadam) या पिता-पुत्रांवर या सभेची जबाबदारी आहे. मागील काळात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे. आपला मुलगा योगेशला राजकारणातून संपवण्याचा कट आखला जात असल्याचं त्यांनी अनेकदा म्हटलं आहे. त्यामुळे आता सभेकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. योगेश कदम यांनी या सभेचा टीझर व्हिडीओ शेअर केला आहे.

कोकणाच्या खेड मधील गोळीबार मैदानावर होणारी मुख्यमंत्र्यांची सभा ही केवळ उद्धव ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्यापुरती मर्यादित नसून या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि शिवसेना तेथे आपलं शक्तिप्रदर्शन करणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला महाराष्ट्रभरातून लोकं आणून गर्दी जमवली होती पण आमच्या सभेला केवळ कोकणातील लोकं असतील असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. पहा ट्वीट: Uddhav Thackeray: हा ‘चुना लगाव आयोग’ आहे, ते सत्तेचे गुलाम आहेत, उद्धव ठाकरेंचा खेडमधील सभेत हल्लाबोल .

पहा सभेचा टीझर

योगेश कदम हे रामदास कदम यांचे पुत्र आहेत. खेडचे विद्यमान आमदार आहेत. विधिमंडळात आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करणारा युवा चेहरा म्हणून त्यांना पाहिलं जात होतं. पण मध्यंतरीच्या काळात अनिल परब एनसीपीला हाताला धरून इथे आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची नाराजी त्यांनीही बोलून दाखवली होती.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना खेडमधून ईडीच्या पथकाने अटक केली आहे. सदानंद कदम हे उद्धव ठाकरे यांचे समर्थक आहे. त्यांनी 5 मार्चच्या सभेदरम्यान उद्धव ठाकरे खेड मध्ये असताना त्यांची भेट देखील घेतली होती.