Eknath Shinde Govt Floor Test: एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला; सत्ताधारी गटाला 164 तर, महाविकासआघाडीला केवळ 99 मते
Devendra Fadnavis, Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या नवनिर्वाचीत सरकारने विश्वासमत ठराव जिंकला आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी अध्यक्षांची निवड झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव (Floor Test) मांडण्यात आला. सुरुवातीला हा ठराव आवाजी मतदानाने पारीत करण्यात आला. त्यानंतर मतदानाची मागणी करण्यात आली. एकनाथ शिंदे सरकारने हा ठराव 164 मतांनी जिंकला. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने मतदान करणाऱ्या आमदार संतोष बांगर यांनी विश्वासदर्शक ठरावात सरकारच्या बाजूने मतदान केले.

विश्वावासदर्शक ठरावात सरकारविरोधात विरोधी पक्षांना 99 मते मिळाली. राज्यात पाठीमागील दोन आठवड्यांपासून प्रदीर्घ काळ सुरु असलेली राजकीय उलथापालथ आजच्या विश्वासदर्शक ठरावाने काहीशी संपली. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना आमदारांची एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीवेळी एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता की, आपल्याला शिवसेनेतील 40 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आपले सरकार विश्वासदर्शक ठराव 166 मतांनी जिंकेल असा दावा केला होता. प्रत्यक्षात सभागृहात मात्र एकनाथ शिंदे यांना 164 मते मिळाली. (हेही वाचा, Eknath Shinde Govt Floor Test: एकनाथ शिंदे गट, शिवसेना, भाजपसह सर्वांचीच कसोटी, विधिमंडळात आज बहुमत चाचणी; राज्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता)

व्हिडिओ

विधानसभा सभागृह सकाळी 11 वाजता सुरु होताच सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. या ठरावास भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षांनी सुरुवातील आवाजी मतदानांनी हा ठराव पारित केला. मात्र, विरोधकांनी मतविभागणीची मागणी केली. विरोधकांची मागणी अध्यक्षांनी मान्य करत मतमोजणी घेतली. या मतमोजणीत सत्ताधारी पक्षाला 164 तर विरोधी बाजूला 99 मते मिळाली.