
महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे. यातच भाजपचे (BJP) जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली होती. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंढे यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांनी लक्षवेधीत विधान केले होते. त्यामुळे खडसे भाजप सोडणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तसेच खडसे नागपूरात जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे पक्षांतराच्या चर्चांनी अधिक जोर धरला. मात्र, या चर्चेवर खडसे यांनी आपली प्रतिक्रिया देत पक्ष सोडण्याचा सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने 12 डिसेंबर रोजी बीड येथे एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी पक्षातील नेत्यांच्या विरोधात भाषण केले होते. दरम्यान, पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत. मात्र, माझे काही सांगता येत नाही, असे विधान त्यांनी केले होते. यातच एकनाथ खडसे नागपूरमध्ये दाखल झाले होते. यानंतर भाजपला आणखी धक्का लागेल का ? अशी शक्यता व्यक्त जात होती. मात्र, नागपूरला मी माझ्या कामासाठी आलो आहे. तसेच मी शरद पवारांची भेट घेतली नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच आपण भाजप सोडणार नाही, असे सांगून सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. हे देखील वाचा- भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर? रायकीय चर्चांना उधाण
दरम्यान, माध्यामांनी एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला होता. वरिष्ठांकडून मन मिळवण्याचा प्रयत्न झाला का? असा प्रश्न एका पत्रकारांनी विचारला. त्यावर खडसे म्हणाले की, मी कुठलाही निर्णय घेतला नाही. यामुळे मन वळवण्याचा प्रश्नच येत नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.