Rohini Khadse | (Photo Credits: Facebook)

रोहिणी खडसे (Rohini Khadse) खेवळकर यांच्या वाहनावर अज्ञातांकडून दगडफेक झाली आहे. जळगाव जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे या चांगदेव येथून एका हळदी समारंभ कार्यक्रम आटोपून मुक्ताईनगरकडे (Muktainagar) येत होत्या. दरम्यान, सूतगिरणी परिसरात दुचाकीवरुन आलेल्या चार अज्ञातांकडून त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यानंतर जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे. हल्ला झाल्यावर खडसे यांच्या वाहन चालकाने रस्त्याच्या बाजूने गाडीसह शेतात पलायन केले. त्यामुळे रोहिणी खडसे आणि त्यांचा चालक सुखरुप बचावल्याची माहिती खडसे कुटुंबीयांनी दिली आहे. दरम्यान, हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

प्राप्त माहितीनुसार, दुचाकीवरुन आलेल्या चार अज्ञात हल्लेखोरांनी खडसे यांच्या वाहनावर प्रथम दगडफेक केली. त्यानंतर त्यांनी लोखंडी रॉडने वाहनावर हल्ला केला. रोहिणी खडसे यांनी पाठिमागील काही दिवसांपासून मुक्ताईनगर तालुक्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांबाबत वारंवार आवाज उठवला होता. त्यामुळे नाराज असलेल्या काही समाजकंटकांनी हा हल्ला केला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन खडाखडी, रोहिणी खडेसे यांची टीका रक्षा खडसे यांच्याकडून प्रत्युत्तर)

दरम्यान, पाठिमागील काही दिवसांपासून जळगावमधील स्थानिक राजकारण जोरदार चर्चेत आहे. प्रामुख्याने खडसे कुटुंबीय आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, महिलांना कोणी त्रास देत असेल तर अशा प्रवृत्तींना चोप दिल्याशिवाय राहणार नसल्याचे वक्तव्य रोहिणी यांनी केले होते. या वक्तव्यानंतर स्थानिक राजकारणात आणखीच गरमागरमी वाढली होती. दुसऱ्या बाजूला एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यापासून आपल्या जीवीताला धोका असल्याचा आरोप केला होता. आता खडसे यांच्याच वाहनावर हल्ला करण्यात आल्याने वातावरण आणखीच तापले आहे. आमदार चंत्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे.