आठवडाभरापूर्वी एनसीपी नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हार्ट अटॅकचा (Heart Attack) त्रास झाला. जळगाव वरून मुंबईला वेळेत आल्याने जीवनदान मिळाल्याचा प्रसंग फोन वर सांगताना खडसे भावनिक झाल्याचे पहायला मिळाले. त्यांना वैद्यकीय मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दाखवलेल्या तत्परतेचे त्यांनी आज फोनवर बोलताना आभार मानले तसेच मुख्यमंत्र्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या. 'तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालंच नसतं' असं ते म्हणाले.
एकनाथ खडसेंनी सांगितला प्रसंग
एकनाथ खडसेंना हार्ट अटॅकचा त्रास झाला तेव्हा ते जळगावला होते. तेथून मुंबईला आणण्यासाठी नाशिकला एक एअर ॲम्ब्युलन्स उभी होती. पण त्याला हवाई वाहतूक विभागाकडून (ATC) क्लीअरन्स मिळत नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर त्याला लवकर क्लिअरन्स मिळाला. नंतर खडसेंना एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत आणल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात तातडीने ऑपरेशन थेटरमध्ये नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. खडसेंच्या हृदयात दोन धमन्यांमध्ये 100% ब्लॉकेज होते. तिसरा ब्लॉकेज 70 % होता. परिस्थिती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशनचा निर्णय घेतला. त्यावेळी एका स्ट्रेचरवरुन दुसऱ्या स्ट्रेचरवर उचलून ठेवत असताना अचानक कार्डिॲक अरेस्ट आला. त्यामुळे हृदय बंद पडलं. हृदयाला होणारा रक्तपुरवठा, ऑक्सिजनही थांबला. तेव्हा डॉक्टरांनी दीड मिनिटांमध्ये लगेच उपचार केले. डॉक्टरांनी शॉक ट्रीटमेंट देऊन बंद पडलेल हृदय पुन्हा सुरू केले', असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. 'तुमचं ते विमान वेळेवर टेक ऑफ झालं नसतं तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं,' असे म्हणत खडसेंनी सारा प्रसंग सांगितला.
एकनाथ खडसेंच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी शरद पवार स्वतः बॉम्बे हॉस्पिटल मध्ये दुसर्या दिवशी पोहचले होते. आता एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचे हॉस्पिटल मधील फोटोज, व्हिडिओज शेअर करण्यात आले आहेत.
भाजपा मध्ये असताना एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्ष नेते पद, महसूल मंत्री, कृषिमंत्री पद भूषवले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत एनसीपी मध्ये प्रवेश केला आहे.