Eknath Khadse on BJP: एकनाथ खडसे दिला भाजपमध्ये पुनरागमन करण्याच्या अटकळांना पूर्णविराम; म्हणाले, 'मला राजकीय वनवासातून बाहेर काढणाऱ्या पक्षाला सोडण्याचा विचार करू शकत नाही'
Eknath Khadse | (Photo Credits: Facebook)

Eknath Khadse on BJP: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी फोनवर केलेल्या कथित संभाषणाच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात पुनरागमन करण्याच्या अटकळांना पूर्णविराम दिला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय कारकीर्द बरबाद केल्याचा आरोप करत भाजप सोडणारे खडसे ऑक्टोबर 2020 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. 20 जून रोजी झालेल्या निवडणुकीत खडसे महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले होते.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण दिले आहे. यासंदर्भात बोलताना खडसे म्हणाले की, ‘चर्चेत तथ्य नाही. राष्ट्रवादी सोडण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांना सोडण्याचा मी विचार करू शकत नाही.' (हेही वाचा - नापाक हेतूने 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणार्‍यांना सोडणार नाही, कारवाई होणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Watch Video))

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, खडसेंनी शहा यांच्याशी झालेल्या भेटीचा इन्कार केला. मात्र, काही वैयक्तिक बाबींसाठी शहा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शहा यांच्याशी झालेल्या दूरध्वनीसंदर्भात कळवले होते. योगायोगाने पवारांनी मला शहांसोबत भेटायला सांगितले आहे. जर शरद पवार स्वत: माझ्यासोबत शहांना भेटायला येणार असतील तर ते मला पुन्हा भाजपमध्ये घेण्यास सांगण्यासाठी माझ्यासोबत येणार नाहीत.' असंही ते यावेळी म्हणाले.

सरकार स्थापनेपासूनच विविध मुद्द्यांवरून शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात पुढे बोलताना खडसे म्हणाले की, 'मी 40 वर्षे भाजपमध्ये काम केले. पक्षवाढीसाठी मेहनत घेतली, महत्त्वाची पदेही भूषवली. मात्र, भाजपमध्ये माझ्यावर अन्याय होत असल्याचे मला जाणवले. मला अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले. या कोंडीनंतर मी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तीन वर्षे राजकारणापासून दूर राहिलो. राजकारण सोडल्यानंतर शरद पवारांनी मदतीचा हात पुढे केला. मी विधानपरिषदेवर निवडून आलो. मला राजकीय वनवासातून बाहेर काढणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी कसा सोडू?' असा सवालही यावेळी एकनाथ खडसे यांनी केला.