Eknath Khadse Likely to Join NCP: जयंत पाटील यांचे रिट्वीट केलेले 'ते' ट्विट एकनाथ खडसे यांच्याकडून डिलीट; पंतप्रधान मोदी यांच्यावर होती टीका
Eknath Khadse | (Photo Credits: Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर टीका करणारे जयंत पाटील (Jayant Patil) यांचे ट्विट रिट्वीट करुन भाजप (BJP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) प्रवेशाचे सूचक संकेत दिले खरे. परंतू, अवघ्या काही वेळातच खडसे यांनी हे ट्विट डिलीट केले. एकनाथ खडसे यांनी हे ट्विट अवघ्या काही वेळातच डिलीट का केले? याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्या समर्थकांनी जळगावमध्ये जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. 'तुम्ही म्हणाल ते धोरण, बांधाल ते तोरण'  असे म्हणत बॅनरही झळकवले आहेत. विशेष म्हणजे खडसे यांच्या समर्थकांच्या बॅनरवरुन भाजपचे चिन्ह 'कमळ' गायब असल्याचे वृत्त आहे.

जयंत पाटील यांचे ट्विट

जयांत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!'.

पंतप्रधान मोदींवरील टीकेचे समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून काल भाषण केले. या भाषणातून अनेकांचा अपेक्षाभंग झाल्याची टीका झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत ट्विट केले. नेमके हेच ट्विटर एकनाथ खडसे यांनी रिट्विट केले आहे. ऐरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या कोणत्याच गोष्टीचे समर्थन कोणताच भाजप नेता करताना दिसत नाही. परंतू, एकनाथ खडसे यांनी हे धारिष्ट्य दाखवले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे हे आता मनाने खूप पुढे गेले असून भाजपमधून बाहेर पडायचे हे जवळपास त्यांनी निश्चित केल्याचे मानले जात होते. (हेही वाचा, Eknath Khadse Likely to Join NCP: ट्विट केलं रिट्विट; भाजप नेते एकनाथ खडसे यांच्याकडून सूचक संकेत, घड्याळ काढणार 'कमळा'चा वचपा?)

Eknath Khadse Likely to Join NCP

शरद पवार काय म्हणाले?

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उस्मानाबाद दौऱ्यावर होते. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांना प्रसारमाध्यमांनी खडसे यांच्याबाबत विचारले. या वेळी पवार म्हणाले 'आपण ज्या ठिकाणी, संघटनेत काम करतो त्या ठिकाणी आपल्या कामाची नोंद घेतली जात नाही, असे जर एखाद्याला वाटत असेल तर अशा वेळी संबंधित व्यक्ती आपली ज्या ठिकाणी नोंद घेतली जाईल त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करतो.' शरद पवार यांचे हे वक्तव्य म्हणजे एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खडसे यांना हिरवा कंदीलच मानले जात होते.

एकनाथ खडसे भाजपमध्येच राहतील

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे विश्वसनीय वृत्त प्रसारमाध्यमांनी अनेकदा दिले. त्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे हे भाजप सोडून कोठेही जाणार नाहीत, असे भाजप नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांच्यासह इतरही अनेक नेते एकनाथ खडसे भाजप सोडणार नाहीत, असेच सांगताना दिसत आहेत.

एकनाथ खडसे हे भाजपमधील तगडे नाव. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, यांच्यानंतर एकनाथ खडसे यांचे नाव पक्षात अग्रक्रमाने घेतले जात असे. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर एकनाथ खडसे यांनाच मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात असे. परंतू, आयत्या वेळी देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे आले आणि ते मुख्यमंत्रीही झाले. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात खडसे महसूल मंत्री आणि क्रमांक दोनचे मंत्री होते. मात्र, भोसरी येथील भूखंड प्रकरणाचे निमित्त जाले आणि खडसे यांची विकेट पडली. त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ खडसे पक्षातून बाजूला पडत गेले ते गेलेच. त्यामुळे गेले प्रदीर्घ काळ खडसे हे भारतीय जनता पक्षामध्ये नाराज आहेत.