Eknath Khadse Likely to Join NCP:  ट्विट केलं रिट्विट; भाजप नेते एकनाथ खडसे यांच्याकडून सूचक संकेत, घड्याळ काढणार 'कमळा'चा वचपा?
Eknath Khadse (Photo Credits-Twitter)

आपल्या कामाची नोंद घेतली जात नाही, असे जर एखाद्याला वाटत असेल तर अशा वेळी संबंधित व्यक्ती आपली ज्या ठिकाणी नोंद घेतली जाईल त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करतो, असे म्हणत शरद पवार ( Sharad Pawar) यांनी हिरवा कंदील दाखवला. परिणामी भाजप (BJP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) प्रवेशाच्या हालचाली वेगवान झाल्या. खडसे यांच्या समर्थकांमध्ये तशा हालाचालिही दिसत आहेत. समर्थकांच्या पोस्टरवरुन भाजपचे चिन्ह 'कमळ' गायब आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांनीही जयंत पाटील (Jayant Patil) यांचे एक ट्विट रिट्विट करत सूचक संकेत दिले आहेत. एकनाथ खडसे यांचे ट्विट-रिट्विट म्हणजे खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित झाल्याचे मानले जात आहे. दुसऱ्या बाजूला राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, विधानसभा निवणडूक २०१९ पूर्वी भाजपने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. त्याचाच वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षही अशीच खेळी करण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींवरील टीकेचे समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून काल भाषण केले. या भाषणातून अनेकांचा अपेक्षाभंग झाल्याची टीका झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत ट्विट केले. नेमके हेच ट्विटर एकनाथ खडसे यांनी रिट्विट केले आहे. एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या कोणत्याच गोष्टीचे समर्थन कोणताच भाजप नेता करताना दिसत नाही. परंतू, एकनाथ खडसे यांनी हे धारिष्ट्य दाखवले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे हे आता मनाने खूप पुढे गेले असून भाजपमधून बाहेर पडायचे हे जवळपास त्यांनी निश्चित केल्याचे मानले जात आहे. (हेही वाचा, जळगाव: शरद पवार यांचा भाजपला दे धक्का? एकनाथ खडसे यांच्या हातावर घड्याळ? 'बांधाल ते तोरण, ठरवाल ते धोरण' म्हणत समर्थकांच्या बॅनरवरुन 'कमळ' गायब)

जयंत पाटील यांचे ट्विट

जयांत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!'.

Eknath Khadse Likely to Join NCP

एकनाथ खडसे भाजपमध्येच राहतील

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे विश्वसनीय वृत्त प्रसारमाध्यमांनी अनेकदा दिले. त्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे हे भाजप सोडून कोठेही जाणार नाहीत, असे भाजप नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांच्यासह इतरही अनेक नेते एकनाथ खडसे भाजप सोडणार नाहीत, असेच सांगताना दिसत आहेत.

शरद पवार काय म्हणाले?

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उस्मानाबाद दौऱ्यावर होते. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांना प्रसारमाध्यमांनी खडसे यांच्याबाबत विचारले. या वेळी पवार म्हणाले 'आपण ज्या ठिकाणी, संघटनेत काम करतो त्या ठिकाणी आपल्या कामाची नोंद घेतली जात नाही, असे जर एखाद्याला वाटत असेल तर अशा वेळी संबंधित व्यक्ती आपली ज्या ठिकाणी नोंद घेतली जाईल त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करतो.' शरद पवार यांचे हे वक्तव्य म्हणजे एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खडसे यांना हिरवा कंदीलच मानले जात होते.

एकनाथ खडसे हे भाजपमधील तगडे नाव. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, यांच्यानंतर एकनाथ खडसे यांचे नाव पक्षात अग्रक्रमाने घेतले जात असे. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर एकनाथ खडसे यांनाच मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात असे. परंतू, आयत्या वेळी देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे आले आणि ते मुख्यमंत्रीही झाले. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात खडसे महसूल मंत्री आणि क्रमांक दोनचे मंत्री होते. मात्र, भोसरी येथील भूखंड प्रकरणाचे निमित्त जाले आणि खडसे यांची विकेट पडली. त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ खडसे पक्षातून बाजूला पडत गेले ते गेलेच. त्यामुळे गेले प्रदीर्घ काळ खडसे हे भारतीय जनता पक्षामध्ये नाराज आहेत.