Chief Minister Uddhav Thackeray (PC - Twitter)

CM Uddhav Thackeray On Marathi Language Day: मराठी भाषेला लाभलेले सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. आज वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृश्य प्रणालीद्वारे परिसंवादाचे आयोजित करण्यात आले होते. या वेबिनारला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, विधिमंडळ मराठी भाषा समितीचे प्रमुख चेतन तुपे आदी नेते उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मराठी ही केवळ मातृभाषाचं नसून ती प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. शिवाजी महाराजांच्यामुळे आज आपण हा दिवस स्वाभिमानाने बघू शकत आहोत. त्यामुळे मराठी भाषेला केवळ अभिजात भाषेचा दर्जाचं नव्हे, तर सर्वोच्च भाषा म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेतून लिहिलेला अग्रलेख ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?’ याची दखल इंग्रजांना घ्यावी लागली होती. मराठी भाषेला गौरवशाली संस्कृती आहे. याचाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उल्लेख केला. (वाचा - Marathi Bhasha Din 2021: मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी न मिळाल्याने मनसे आक्रमक; 'कार्यक्रम होणारच' अमेय खोपकर यांचा इशारा)

शासकीय व्यवहारात सोपे शब्द वापरण्याची, सोप्या भाषेतील शब्दकोश तयार करण्याची गरजदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. स्वातंत्रवीर सावरकर यांनी मेयर या शब्दाला महापौर हा प्रतिशब्द दिला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या परिसंवादातील “मराठी भाषेला अभिजात दर्जा” या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, डॉ. विजया वाड, प्रा. हरी नरके, माजी विधानपरिषद सदस्य हेमंत टकले, प्रा. मिलिंद जोशी यांनी आपले विचार व्यक्त केले.

दरम्यान, उद्या ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त “मराठी भाषा गौरव दिन” साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आज परिसंवादाचे आयोजित करण्यात आले होते.