Palghar Earthquake on 6th April: महाराष्ट्र राज्यातील पालघर (Palghar) जिल्ह्यात रविवारी (5 एप्रिल) रात्री पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री 12 नंतर हडाणू (Dahanu) आणि तलासरी (Talasari) तालुक्यात भुकंपाचे धक्के बसले असून हा भूकंप 3.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. भूकंपाचे धक्के बसताच लोकांची घाबरगुंडी उडाली आणि त्यांनी घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे रात्रीच्या वेळेस रस्त्यांवर मोठी गर्दी जमली होती. या भूकंपाने घरांना तडे गेले असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.
पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत असतात. गेल्याच आठवड्यात बुधवारी त्यानंतर शुक्रवारी भूकंपाच्या धक्कांनी रहिवाशांना हादरवले. त्यानंतर काल पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसल्याने रहिवाशी काहीसे घाबरलेले आहेत. सध्या देशात कोरोना व्हायरसचे संकट ठाण मांडून बसल्याने लॉकडाऊन आहे. त्यामुळे गर्दी न करण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र भूंकपाच्या धक्क्याने निर्माण झालेल्या भीतीपोटी आणि जीव वाचवण्यासाठी रहिवाशांनी रस्त्यावर गर्दी केली. (पालघर: भूकंप जनजागृती अभियानात विद्यार्थ्यांना आगीतून उड्या मारायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड)
दरम्यान आज सकाळी 7 च्या सुमारास हिमाचल प्रदेश मधील चंबा येथेही भूंकपाचे धक्के बसले. या भूंकपाची तीव्रता देखील 3.1 रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.