Dussehra 2021: किरीट सोमय्या यांच्या रावणावर BMC आणि मुंबई पोलिसांकडून कारवाई
Kirit Somaiya | (File Photo)

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या रावणावर मुंबई महापालिका (BMC) आणि पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हे दसऱ्या निमित्त भ्रष्टाचाररुपी रावणाचे दहन करणार होते. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांनी आणि महापालिका अधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्या रावणावर कारवाई केली आहे. दसरा सणादिवशी रावण दहनाची परंपरा आहे. या परंपरेचे पालन करत सोमय्या हे रावण दहन करणार होते. मात्र, रावण दहनासाठी किरीट सोमय्या यांनी कोणत्याही प्रकारे पूर्वपरवानगी घेतली नव्हती. त्यामुळे महापालिकेने ही कारवाई केल्याचे समजते.

महापालिकेने केलेल्या कारवाईबाबत किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, महापालिका अधिकारी असल्याचे सांगत पोलीस काही लोकांना सोबत घेऊन आले आणि त्यांनी कारवाई सुरु केली. कारवाईबाबत आम्हाला कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. ते आम्हाला हवे ते करु असे म्हणत होते. मला झेड सुरक्षा असताना पोलिसांनी ही कारवाई केली. किरीट सोमय्या हा घोटाळेबाज आणि भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लढतो म्हणूनच ही कारवाई करण्यात आली. आम्ही भ्रष्टाचाराचा रावण जाळणार होतो, असेही किरीट सोमय्या म्हणाले. (हेही वाचा, Dussehra 2021: यंदा दसऱ्याला भाजप करणार मविआ सरकारच्या 'घोटाळ्यांच्या पुतळ्याचे दहन')

किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''पुन्हा ठाकरे सरकारची दादागिरी. आम्ही आज 5 वाजता घोटाळ्याचा राक्षस चा पुतळा चे दहन करणार आहोत. आत्ताच 1 वाजता पोलीस आणि महापालिका अधिकारी माझा कार्यालयात येवून पुतळा ताब्यात घेत आहे.... खाजगी सोसायटी मधे , खाजगी कार्यालयात घुसून घोटाळ्याचा रावण राक्षस चे अपहरण ठाकरे सरकार करीत आहे.''

ट्विट

किरीट सोमय्या यांनी नेहमीच महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. प्रामुख्याने महाविकासआघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळही उडाली होती. किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब, हसन मुश्रीफ यांच्यासह इतरही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावर हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला आहे.