Lockdown: राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत कलम 188 नुसार 95 हजार 678 गुन्ह्यांची नोंद - अनिल देशमुख
Anil Deshmukh | Photo Credits: Twitter

Lockdown: राज्यात लॉकडाऊनच्या (Lockdown) कालावधीत कलम 188 नुसार 95 हजार 678 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सांगितलं आहे. यातील 18 हजार 722 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच विविध गुन्ह्यांसाठी 3 कोटी 51 लाख 38 हजार 694 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यासंदर्भात अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

दरम्यान, पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊन काळात या 100 नंबर वर 84 हजार 945 फोन आले. या सर्व नंबरची योग्य दखल घेण्यात आली असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. याशिवाय राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा 642 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 11 हजार 638 व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.(हेही वाचा - Coronavrius: राज्यात आयसीयू बेड्सची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कराकडे विनंती)

लॉकडाऊन काळात राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 184 घटना घडल्या आहेत. यातील 663 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 3 आणि पुणे येथील एका पोलिसाला आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच आतापर्यंत राज्यात 42 पोलीस अधिकारी आणि 414 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. लॉक डाऊनमध्ये थोडीशी शिथिलता म्हणजे लॉकडाऊन संपले असे नाही. उलट या काळात सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असं आवाहनही अनिल देशमुख यांनी नागरिकांना केलं आहे. पोलिसांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. राज्यात एकूण 4808 हजार रिलिफ कँम्प आहेत. यात 4 लाख 42 हजार 298 लोकांची व्यवस्था करण्यात आली असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.