Sanjay Raut, Nitin Gadkari (PC - ANI)

Sanjay Raut On Nitin Gadkari: मोदी सरकार (Modi Government) च्या आठ वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचे श्रेय शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना दिले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी नितीन गडकरींचे कौतुक करताना सांगितले की, नितीन गडकरी यांचा विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असून त्यांनी विकासकामांमध्ये कधीही राजकारण पाहिले नाही.

संजय राऊत म्हणाले की, आज आपण देशात जेवढा विकास पाहतो त्यातील 90 टक्के विकास नितीन गडकरींमुळे झाला आहे. चांगल्या दर्जाच्या महामार्गांसोबतचं देशाच्या सीमा रस्त्यांनी जोडल्याचं श्रेय नितीन गडकरींना द्यायला हवं. देशात ठिकठिकाणी जे उड्डाणपूल बांधले जात आहेत, त्याचे श्रेयही नितीन गडकरींना जाते, असंही राऊत यावेळी म्हणाले. भाजप आणि शिवसेना यांच्यात मतभेद असले तरी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे नितीन गडकरी यांच्याशी चांगले संबंध आहेत. (हेही वाचा - Sanjay Raut On Modi Government: ED आणि CBI च्या कारवाईवर शिवसेना संतप्त; संजय राऊत म्हणाले, 'ना महाराष्ट्र झुकणार, ना शिवसेना घाबरणार')

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, नितीन गडकरी हे शरद पवारांनंतरचे दुसरे नेते आहेत जे कधीही विकासाच्या बाबतीत राजकारण करत नाहीत. नितीन गडकरी यांना त्यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना संजय राऊत म्हणाले की, नितीन गडकरी महाराष्ट्रातून आलेले असल्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान आहे. भाजपशी संबंधित असूनही प्रत्येक पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. सर्वत्र टीका होत असली तरी ती टीका विषारी नसावी, असं मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं.

दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध खूप चढ-उताराचे राहिले आहेत. 1989 मध्ये पहिल्यांदा शिवसेना-भाजप युती झाली. यानंतर 1995 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेने भाजपच्या मदतीने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. वाजपेयी सरकारच्या काळातही शिवसेना एनडीए आघाडीचा भाग होती. 2019 ची लोकसभा निवडणूकही दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली. मात्र, मोदी सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून एकच मंत्री करण्यात आला. त्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये तेढ सुरू झाले.