प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएके(DSK) अर्थात दीपक कुलकर्णी (Deepak Kulkerni) यांच्या विरूद्ध दाखल खटल्यामध्ये आज (17 ऑगस्ट) दीपक कुलकर्णी यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना बॉम्बे हाय कोर्टाकडून (Bombay High Court) दिलासा मिळाला आहे. आज कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. 2018 पासून कुलकर्णी यांच्या कुटुंबातील अनेक व्यक्ती फसवणूकीच्या आरोपाखाली तुरूंगात आहेत. आज न्यायालयीन सुनवणी मध्ये हेमंती कुलकर्णी (Hemanti Kulkerni) यांना जामीन मिळाला असला तरीही दीपक कुलकर्णी यांना मात्र जामीन फेटाळण्यात आला आहे. आता त्यांच्या जामीनासाठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज केला जाणार आहे. अशी माहिती त्यांचे वकील अशुतोष श्रीवास्तवा यांनी दिली आहे.
दरम्यान शुक्रवारी डीएसके फसवणूक प्रकरणाची न्या. डी. पी. नाईक यांच्यासमोर सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. फसवणुकीच्या प्रकरणात दीपक कुलकर्णी यांच्यासह पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, बंधू मकरंद, पुतणी, जावई यांनाही अटक करण्यात आली होती. (नक्की वाचा: Mumbai: वेळेवर फ्लॅटचा ताबा न देणे बिल्डरला पडले महागात; खरेदीदारास 8 लाखांच्या ऐवजी मिळणार 48 लाख रुपये).
बांधकाम व्यवासायिकातील मोठं नाव म्हणून डीएसके यांची ओळख होती. 2017 साली अनेक ठेवीदारांना फसवल्याप्रकरणी कुलकर्णी कुटुंबाच्या विरूद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. त्यांनी ठेवीदारांचे 2043 कोटी रूपयांची फ्सवणूक केल्याचं दोषारोप पत्रामध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये 33 हजार ठेवीदारांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत.त्यानंतर 17 फेब्रुवारी 2018 ते पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा जेल मध्ये करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी दीपक कुलकर्णी यांचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांचा देखील जामीन मंजूर झाला आहे.
डीएसके ने अनेक बॅंकांकडून कर्ज घेतलं आहे. ही कर्जाची रक्कम तीन हजार कोटी पेक्षा अधिक आहे. त्यांना कर्ज देण्यातही अनेक बॅंक अधिकार्यांचा हात असल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणामध्ये ईडी ने देखील चौकशी केली आहे.