Maharashtra Vidhan Parishad Upasabhapati Election: महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती पदी पुन्हा शिवसेनेच्या डॉ. नीलम गोर्हे (Dr Neelam Gorhe) यांची निवड झाली आहे. आवाजी मतदान पद्धतीने झालेल्या या निवडणूकीमध्ये डॉ. नीलम गोर्हे यांनी बाजी मारली आहे. काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सभागृहात नीलम गोर्हे यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान भाजपाने सभात्याग केल्याने महाविकास आघाडीसाठी मार्ग मोकळा झाला आणि बिनविरोध नीलम गोर्हे विधानपरिषद उपसभापती झाल्या.
दरम्यान मागील वर्षी जून महिन्यात पहिल्यांदा नीलम गोर्हे यांना पहिल्यांदा उपसभापती पद दिले होते. आता पुन्हा त्यांना ही संधी देण्यात आली आहेत. त्यांच्या विरूद्ध भाजपाच्या भाई गिरकर यांचे आव्हान होते. मात्र निवडणूकीच्या वेळेस भाजपाने सभात्याग केला आहे. काही वेळापूर्वीच भाजपाने निवडणूकीवर आक्षेप घेत न्यायालयामध्ये धाव घेतली होती. कोरोना प्रादुर्भावामुळे उपसभापती पदाची निवडणूक घेऊ नये अशी विनंती भाजपने केली होती. कोरोनामुळे अनेक आमदार अनुपस्थित आहेत अशावेळी एकतर्फी लढत होण्याची शक्यता अधिक असुन ही लोकशाहीची गळचेपी आहे असे मत विधान सभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांंनी मांंडले होते.
महाराष्ट्र विधानपरिषदेत 78 पैकी 18 जागा रिकाम्या आहेत. तर 60 जागांंपैकी 22 आमदार भाजपचे आहेत. अन्य आमदारांंमध्ये शिवसेना 14, राष्ट्रवादी काँग्रेस 9, काँग्रेस 8 असे संंख्याबळ आहे. महाविकास आघाडीने एकत्र येत आजची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध केली आहे.
आज शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रवक्त्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्येही डॉ. नीलम गोर्हे यांच्या नावाचा समावेश आहे. नीलम गोर्हे या पुण्याच्या असून त्या उच्च शिक्षित आहेत. त्यांनी डॉक्टरकीचे शिक्षण घेतले आहे. 1998 पासून शिवसेनेमध्ये आहेत.