Sanjay Raut | Photo Credits: Twitter

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संपूर्ण देशात जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. त्यानंतर मोदींनी आज आपल्या ट्विटर हँडलवरून जनतेला घरात बसण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या 'जनता कर्फ्यू'बाबत (Janta Curfew) केलेल्या आवाहनाची खिल्ली उडवू नका, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनामध्ये चांगली भावना आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे. दरम्यान, केंद्र तसेच राज्य सरकारकडून सर्व कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सुचना दिल्या आहेत. परंतु, आज संजय राऊत ‘सामना’ वृत्तपत्राच्या कार्यालयात बसून काम करणार आहेत. ‘सामना’चं कार्यालय हेचं आपलं घर असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Coronavirus In Maharashtra: मुंबई मध्ये कोरोना बाधित रूग्णाचा दुसरा बळी; राज्यात COVID 19 पॉझिटिव्हची संख्या 74)

सामनातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देण्यात आल्या असून काहींना घरातून काम करण्यास सांगितलं आहे. मात्र, मी सामनाच्या कार्यालयात जाऊन काम करत आहे. कारण माझं घर सामना आहे. त्यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजे सामना आहे. तिथे शांतपणे बसून काम करेन. कार्यालयात कुणीचं नाही म्हणून मला तिथं जावं लागेल. माझ्या घरातील सर्व कुटुंब सदस्य आज त्यांच्या खोलीत क्वारंटाईन आहेत. कुटुंबातील कोणताही सदस्य घराबाहेर पडलेला नाही, असंही राऊत यांनी सांगितलं आहे. या अवघड परिस्थितीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या संकट काळात ते राज्याचे नेतृत्व करीत आहेत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.